मुलाखत, विदर्भ आणि आरक्षण


शरद पवार यांची राज ठाकरे यांनी घेतलेली मुलाखत आता चर्चेचा विषय व्हायला लागली आहे. या मुलाखतीत पवारांनी तसे नवे काही सांगितलेले नाही पण लोकांना त्यांनी मांडलेली आरक्षणाची कल्पना फार महत्त्वाची आणि नवी वाटायला लागली आहे. आरक्षण हे जातीवर नसावे तर ते आर्थिक आधारावर असावे असे त्यांनी म्हटले आहे. असे त्यांनी म्हणण्याची ही काही पहिली वेळ नाही. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना करून पहिली निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीचा जाहीरनामा काढला तेव्हा त्यात आर्थिक आधारावर आरक्षण देण्याचे आश्‍वासन दिले होते. तेव्हा शालिनीताई पाटील त्यांच्या पक्षात होत्या.

त्यांनी ती निवडणूक झाल्यानंतर राज्यात या मागणीसाठी मराठा समाजाचे मेळावे घेतले तेव्हा पवारांनी शालिनीतार्ईंना पक्षातून काढून टाकले. तेव्हा शालिनीतार्ईंनी पवारांना एक सवाल केला होता की, आपण तर पक्षाच्या जाहीरनाम्यातली एक मागणी पुढे करीत आहोत मग आपल्याला पक्षातून काढून का टाकले जात आहे ? तेव्हा पवार त्यांना काहीही सयुक्तिक उत्तर देऊ शकले नाहीत. आता पुन्हा या मुलाखतीचे निमित्त करून पवार, काही तरी नवी कल्पना मांडत आहोत अशा आविर्भावात आर्थिक आधारावर आरक्षणाचा पुरस्कार करीत आहेते मात्र आता आपल्या देशातले आरक्षण अशा काही अवस्थेत आले आहे की, ते कोणी बदलूही शकणार नाही आणि कोणी रद्दही करू शकणार नाही. मग कोणी कितीही नवनव्या कल्पना मांडोत. ते जातीवर आधारलेले तर राहणारच आहे पण नवनव्या जाती आरक्षणाच्या मागण्या करत आहेत.

मुलाखतीत विदर्भाचाही मुद्दा आला. बाळासाहेब ठाकरे यांनी वेगळ्या विदर्भाला विरोध केला होता. आता पवारही तसा तो करीत आहेतच पण बाळासाहेबांंप्रमाणेच वेगळ्या विदर्भाची मागणी ही अ मराठी लोकांची असल्याचे पवारही म्हणत आहेत. यातही नवे काही नाही. उद्धव ठाकरे यांनी आपण ही मुलाखत चोरूनही पाहिलेली नाही असे म्हणत म्हणत तिच्यावर टीका केली आहे. चोरूनही न पाहता तिच्यावर कशी टीका करता आली हे काही समजत नाही. पण त्यांनी बाळासाहेब जे काही म्हणतात ते कळायला ५० वर्षे जावी लागतात असे म्हटले आहे. ही मात्र अतिशयोक्ती आहे. बाळासाहेबांनी असे कोणते दिव्य तत्त्वज्ञान मांडले आहे ? उलट आधी केवळ मराठीच्या मुद्यावर शिवसेनेची स्थापना करणार्‍या बाळासाहेबांना आपली ही चूक ४० वर्षांत कळली आणि त्यांनीच नंतर हिंदुत्वाची भूमिका घेतली.

Leave a Comment