देशी गुंतवणूक


महाराष्ट्र शासनातर्फे काल मॅग्नेटिक महाराष्ट्र हा उपक्रम हाती घेण्यात येऊन त्यात राज्यातील गुंतवणुकीचे १२ लाख कोटी रुपयांचे प्रस्ताव करारबध्द करण्यात आले. यामध्ये अनेक प्रकारचे उद्योग आहेत आणि त्यातून महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला मोठी गती मिळणार आहे. परंतु या गुंतवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्यात देशी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात उतरलेले दिसत आहेत. त्यातल्या त्यात महाराष्ट्रातल्या काही गुंतवणूकदारांनी या उपक्रमातून शासनाशी करार केलेले आहेत. काल मॅग्नेटिक उपक्रमात औरंगाबादच्या दोन देशी उद्योगांना पुरस्कार देण्यात आले. त्यातला एक्स्पर्ट ग्लोबल हा उद्योग चालक विरहित कार निर्मिती करण्याच्या प्रयत्नात आहे. तर दुसरा मेटल मॅन हा उद्योग ऍटोमेटिव्ह सेक्टरसाठी कार्यरत आहे.

महाराष्ट्रातले उद्योग असे आघाडीवर येत असतानाच कालच्या उपक्रमात अमोल यादव यांच्याशी सरकारने ३५ हजार कोटी रुपयांचा करार केलेला आहे. कॅप्टन अमोल यादव हे सध्या महाराष्ट्रात आकर्षणाचा विषय झाले आहेत. कारण लष्करातून निवृत्त झालेल्या या अधिकार्‍याने केवळ स्वतःच्या जोरावर आपल्या घराच्या गच्चीवर एक सहा आसनी छोटे विमान तयार केले आहे. हे विमान त्यांनी २०१६ च्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या मेक इन इंडिया सप्ताहात समोर आणले आणि सर्वांना चकित केले. केवळ एक व्यक्ती स्वतःच्या ताकदीवर एक विमान तयार करू शकते ही गोष्ट सर्वांना कौतुकाची वाटलीच. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केवळ कौतुक करून थांबले नाहीत.

या दोघांनीही अमोल यादव यांना बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चा करून अशा विमानाचा एक देशी कारखाना भारतात उभा करता येईल का याची चाचपणी केली. सामान्यपणे अशा प्रकारचे तंत्रज्ञान जाणणारे तंत्रज्ञ काहीतरी शोध लावतात आणि एखादा बडा उद्योगसमूह त्यांचे तंत्रज्ञान विकत घेऊन वस्तूचे उत्पादन स्वतः करतात. अमोल यादव यांच्या बाबतीत मात्र वेगळा प्रकार घडला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा स्वतःचा उद्योग उभा करण्यास प्रवृत्त केले आणि शासनातर्फे शक्य ती सगळी मदत देऊन त्यांच्याशी ३५ हजार कोटी रुपयांचा करार केला. शासनाने त्यांना पालघर जिल्ह्यात १९ आसनी विमान निर्मितीचा कारखाना उभा करण्यासाठी १५७ एकर जमीन बहाल केली आहे. विशेष म्हणजे हा कारखाना पालघर सारख्या उपेक्षित जिल्ह्यात होत आहे.

Leave a Comment