ट्रेड मीलचे मूळ कशात आहे?


वजन कमी करण्यासाठी कोणी जीम मध्ये गेला तर त्याला हमखासपणे ट्रेडमीलवर पळायला सांगितले जाते. कारण वजन कमी करण्यासाठी पळणे गरजेचे असते आणि लोकांना उघडयावर फिरायला किंवा पळायला जाणे होत नाही. अनेकांना संकोच वाटतो तर काहींना लवकर उठून रस्त्यावर पळायला जाणे वेळेत शक्य होत नाही. अशा लोकांना ट्रेडमील हा एक छान पर्याय आहे. कारण या साधनावर उभे राहून आपण ठराविक वेळ चालू किंवा पळू शकतो. तसा वेळ सेट केलेला असतो. एवढेच नाही तर आपण किती वेगाने चालत किंवा पळत आहोत हे त्यावर पाहता येते. हा वेग कमी जास्त करणे आपल्या हातात असते. महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या पळण्याने किती उष्मांक जळाले याचीही नोंद या यंत्रावर होत असते.

हृदयविकाराची तपासणी करतानाही याच यंत्राचा वापर होतो. तिथे या यंत्रावर होणार्‍या नोेंदी वेगळ्या असतात. तिथे पेशंटच्या शरीराला काही यंत्रे जोडली जातात आणि पळण्याने किंवा चालण्याने त्याच्या हृदयाचे ठोके किती पडतात याची नोंद केली जाते. किती पळाल्याने किती दम लागतो याचीही तपासणी केली जाते. दम लागल्यानंतर किती वेळाने रुग्ण पूर्वपदावर येतो याला या चाचणीत महत्त्व असते. हे सारे खरे आहे आणि अनेक शहरांत कितीतरी लोक या यंत्राचा वापर करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करीत असतात किंवा हृदयविकाराची चाचणी घेत असतात. पण यातल्या बहुतेकांना या यंत्राचे मूूळ कशात आहे हे माहीत नसते.

वास्तविक ही मशीन आधी लंडनमध्ये तयार करण्यात आली होती आणि तिचा वापर कैदेतील आरोपींचा छळ करण्यासाठी केला जात होता. असा कैदी त्यावर उभा राहून पोलीस सांगतील तेवढा वेळ पळत राहतो. त्याने किती वेगाने पळावे याचा निर्णय तो पोलीस घेत असतो. मशीनचा वेग कैद्याच्या हातात नसून तो पोलिसाच्या हातात असतो आणि किती वेळाने मशीन थांबवावी हेही पोलीसच ठरवीत असतात. मशीन थांबत नाही तोपर्यंत कैद्याला पळावे लागते. कितीही दम लागला तरीही मशीन थांबवली जात नाही. परिणामी असा कैदी कितीही धापा टाकायला लागला तरी शिपाई मशीन बंद करीत नाही. पोलिसांच्या चार्टर्ड मध्ये अशी छळवणूक बेकायदा असल्याचे म्हटले असले तरीही ही मशीन लावून छळण्याचे प्रकार काही कमी होत नव्हते. शेवटी तशी सक्ती करण्यात आली. मग ही यंत्रे व्यायामशाळे साठी वापरण्याची कल्पना पुढे आली.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही