तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी एकवटले लोकप्रतिनिधी


पुणे : लोकप्रतिनिधींसह कामगार संघटना पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी सक्रीय झाल्या असून बेशिस्त कर्मचाऱ्यांवर मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून सुरू केलेली कारवाई तसेच पीएमपीच्या कारभारातील राजकीय ढवळाढवळ पूर्णपणे बंद केल्यामुळे मुंढे यांना हटविण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत.

बससेवा शहराची सार्वजनिक वाहतुक व्यवस्था असलेल्या ‘पीएमपी’ या स्वतंत्र कंपनीची निर्मिती झाल्यानंतर सुधारेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण पीएमपीच्या तोट्यात २००७ नंतर दरवर्षी वाढच होत गेली. कोलमडलेली प्रशासकीय व्यवस्था, खिळखिळ्या बस, अधिकारी व कर्मचाऱ्यांची मनमानी असे चित्र निर्माण झाले. तसेच वाढत्या राजकीय हस्तक्षेपामुळे त्यात आणखीनच भर पडल्याचा आरोप सातत्याने करण्यात आला.

पीएमपीच्या स्थितीत अनेक अधिकारी येऊनही काही फरक पडला नाही. मुंढे यांच्यासारखे कर्तबगार अधिकारी त्यासाठी पीएमपीत यावेत, यासाठी अनेकांनी आग्रही भूमिका घेतली. पण, यातीलच काही जण मागील एप्रिल महिन्यापासून आता मुंढेच्या कामाच्या पध्दतीवर फुली मारू लागले आहेत. मुंढे यांच्या बदलीसाठी पक्षांतील वरिष्ठ नेत्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दोन्ही पालिकांतील पदाधिकाऱ्यांशी मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसांतच त्यांचे खटके उडु लागले. त्यांच्यावर लोकप्रतिनिधींना सन्मानाने वागणूक देत नसल्याचा आरोप होत असून याबाबत अनेक नगरसेवकांनी सर्वसाधारण सभांमध्ये उघडपणे नाराजी व्यक्त केली. मुंढे यांची कार्यशैली हिटलरप्रमाणे असल्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनीही म्हटले होते. मुंढे यांनी पीएमपी होणारा राजकीय हस्तक्षेप पूर्णपणे बंद करून सत्ताधाऱ्यांसह सर्व राजकीय पक्षांना दुर ठेवल्यामुळेही मुंढे यांच्यावर अनेक पदाधिकारी नाराज असून त्यांच्या बदलीसाठी आग्रही आहेत.

Leave a Comment