वजन कमी करण्यासाठी काय काय करता येईल यावर अनेक तज्ज्ञ मार्गदर्शन करीत असतात पण या बाबत त्यांचे एकमत होतेच असे नाही. आता काही संशोधकांनी वजन कमी करण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणून पोहण्याची शिफारस करायला सुरूवात केली आहे. पोहण्याने वजन कमी तर होतेच पण शरीर बलवान होते आणि निरोगी होते. उष्मांकाचे ज्वलन, तंदुरुस्ती आणि वजनात घट या तीन गोष्टी एकदम साध्य करणारा एकमेव व्यायाम म्हणून पोहण्याकडे पाहिले जातेे. सातत्याने पोहण्याचा व्यायाम करणारांची शरीरयष्टी तो व्यायाम न करणारांपेक्षा जास्त सडपातळ असते. असे एका पाहणीत आढळून आले आहे. हे का शक्य होते याचे विश्लेषण खालील प्रमाणे करण्यात येते.
पोहण्याने वजनात घट
चालण्याने व्यायाम होतो ही गोष्ट खरी आहे. चालताना आपले शरीर आपल्याला पुढे न्यावे लागते. चालताना शरीराला हवेचा प्रतिकार होतो आणि तो कमी करण्यासाठी शरीराची ताकद वापरली जाऊन व्यायाम होतो. पण पाणी हे हवेपेक्षा ८०० पटीने जादा ताकदवान असते. म्हणजे पाण्यातून शरीर पुढे ढकलताना हवेपेक्षा तेवढ्या जादा ताकदीची गरज असते आणि त्यामुळे तेवढा जादा व्यायाम होतो. हा जादा व्यायाम हात, पाय, खांदे, नितंब, या सगळ्या अवयवांना होतो आणि या सगळ्या अवयवांवरची जादा चरबी कमी होते. साध्या पोहण्याने तासाभरात ५०० उष्मांक जळतात तर वेगाने पोहल्याने तासाभरात ७०० उष्मांक जळतात. शिवाय हे सारे अवयव बळकट होतात.
आपण पाण्यात उतरतो तेव्हा आपल्या शरीराला एक प्रकारची वजन विरहित अवस्था प्राप्त होत असते. या अवस्थेत आपल्या शरीराच्या गुडघे आणि हात या सारख्या अवयवांवर सांध्यांचा भार पडत नाही आणि तेवढा वेळ सांध्यांना आराम मिळतो. शिवाय पळताना होते तशी पोहताना पडून जखम होण्याची भीती नसते. पोहण्याने तारुण्य टिकते. दररोज पोहण्याचा व्यायाम करणारा त्याच्या प्रत्यक्षातल्या वयापेक्षा २० वर्षांनी तरुण दिसतो. पोहण्याचा चांगला परिणाम रक्तदाब, हृदय विकार, चरबीचे प्रमाण, तसेच मज्जा संस्था यांच्यावरही होतो. दररोज किती वेळ पाहले पाहिजे याचे प्रमाण नेमकेपणाने सांगता येत नाही. पण ती वेळ त्याचे वजन आणि क्षमता यावर अवलंबून असते. तेव्हा पोहण्याचा व्यायाम सुरू करताना तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच वेळ ठरवला पाहिजे. आठवडयातून किमान अडीच तास तरी पोहण्याचा व्यायाम झाला पाहिजे.