नगर जिल्ह्याचे विभाजन


महाराष्ट्रात जिल्ह्यांचे विभाजन हा नेहमीच चर्चेचा विषय झाला आहे. १९८० पासून ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू झाली आणि राज्यात दहा नवे जिल्हे निर्माण झाले. आता अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होणार असल्याची घोषणा या जिल्हचे पालकमंत्री राम शिंदे यांनी केली आहे. लवकरच हा निर्णय सरकारकडून अधिकृतपणे जाहीर केला जाईल असे त्यांनी म्हटले आहे. नगर हा जिल्हा मोठा आहे. त्याचे विभाजन होणे गरजेचे आहे कारण जिल्हा फार मोठा असल्यास त्याचा कारभार फार अवघड होऊन जातो. तसा विचार केला तर ठाणे हा फार मोठा जिल्हा होता. त्याचे विभाजन करून पालघर हा नवा जिल्हा निर्माण करण्यात आला असला तरीही आता उरलेला ठाणे जिल्हाही काही लहान नाही. या जिल्ह्यात पाच ते सहा महानगरपालिका आहेत. ठाण्याचे अजून एक विभाजन करण्याची मागणी केली जात आहे.

राज्यात नगर हा आता सर्वात मोठा जिल्हा मानला जातो पण त्याच्याच बरोबर नाशिक, पुणे, सोलापूर हेही मोठे जिल्हे आहेत आणि त्यांच्याही विभाजनाची फार जुनी मागणी आहे. नगर जिल्हा आणि हे तीन जिल्हे यांच्यात एक फरक आहे.या तीन जिल्ह्यात सोलापूर, नाशिक आणि पुणे या तीन मोठ्या शहरांचा समावेश होतो. नगर जिल्हा आकार मानाने मोठा असेलही पण हे तीन जिल्हे लोकसंख्येने मोठे आहेत. पुणे शहराचीच एकट्याची लोकसंख्या पूर्ण नगर जिल्ह्यापेक्षा अधिक आहे. नाशिक जिल्हाही विस्ताराने फार पसरलेला आहे. सोलापूर जिल्ह्याचे विभाजन करून पंढरपूर हा नवा जिल्हा निर्माण करावा अशी मागणी किती तरी वर्षांपासून केली जात आहे. तीही पूर्ण झाली पाहिजेे.

महाराष्ट्र शासनाकडे जिल्हा विभाजनाची मोठी योजना तयार असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले होते आणि त्यानुसार राज्यातल्या किमान १२ जिल्हंचे विभाजन करण्यात येणार असल्याचे प्रसिद्ध झाले होते. त्यात बीड, ठाणे, नांदेड या जिल्ह्यांचाही अंतर्भाव होता. जिल्ह्यांचे विभाजन करून नवे जिल्हे निर्माण करणे ही गरज आहे पण ते काम फार खर्चिक असते. कारण केवळ नवे जिल्हे निर्माण करण्याने काम भागत नाही. नवा जिल्हा तयार झाला की त्यात नवे तालुकेही निर्माण करावे लागतात. सारी प्रशासकीय यंत्रणा विभाजित होते. नवी तहसील कार्यालये, नवे तलाठी सज्जे, नवीन विभागीय केन्द्रे, तिथली अनेक कार्यालये आणि न्यायालये असा नव्या निर्मितीचा मोठा व्याप असतो म्हणून जिल्हा विभाजनाचे काम टप्प्याटप्प्याने होत असते.

Leave a Comment