दरवर्षी याच रंगाच्या बॅगेतून का आणला जातो ‘अर्थसंकल्प’


देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली असून अर्थमंत्री अरूण जेटली येत्या १ फेब्रुवारीला यंदाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. संबंधित मंत्री एक लाल रंगाची बॅग दरवर्षी अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी घेऊन आत जाताना दिसतो. हा क्षण मीडियादेखील हमखास कॅमेर्‍यात कैद करते. पण लाल बॅग घेऊन अर्थमंत्री अर्थसंकल्पादिवशीच संसदेत प्रवेश का करतात ? त्यामागे इतिहासही तेवढाच रंजक आहे.

ब्रिटीश लोकांची अर्थसंकल्प मांडण्याची संकल्पना असून आपणही ब्रिटीश नेत्यांप्रमाणेच ही संकल्पना आत्मसात केली आणि त्यामुळे लाल बॅग अर्थमंत्री घेऊन जातात. ब्रिटीश चान्सलर ग्लॅडस्टोन यांनी १८६० साली लाकडी बॅगेवर लाल रंगाचे लेदर लावले होते. महाराणी व्हिक्टोरियाचे मोनोग्राम त्यावर लावले. त्यामुळे नकळत लाल बॅगेचा पायंडा पडला. बॅगेचा रंग अनेकांनी बदलला पण लाल रंगाचा दिमाख काही वेगळाच असल्यामुळे या रंगाचा ट्रेन्ड सुरू झाला.

ब्रिटनमध्ये अर्थमंत्री रॉबर्ट वॉलपोल १७३३ साली लेदर बॅग घेऊन अर्थसंकल्प मांडायला गेले होते. फ्रेंच भाषेत लेदर बॅगेला ‘बोजोट’ किंवा ‘बुगेट’ असे म्हटले जाते. त्याचा अपभ्रंश होऊन ‘बजट’ हा शब्द आला. संसदेमध्ये जेव्हा वॉलपोल पोहचले तेव्हा त्यांच्या सहकार्‍यांनी मंत्रीजी बजेट उघडा आणि बघा यामध्ये काय आहे? असे सांगितले. पण अनेकांनी त्यानंतर देशाचा आर्थिक लेखाजोखा मांडण्याच्या प्रक्रियेला ‘बजेट’ हेच नाव दिले.

Leave a Comment