ट्विटरवर सर्वाधिक ट्विट्चा विक्रम भारताच्या ६९ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पार पडला असून देशभरातून प्रजासत्ताक दिनानिमित्त वेगवेगळे हॅशटॅग वापरून जवळपास ११ लाख ट्विट् भारतीय ट्विपल्सकडून करण्यात आल्याचे ट्विटरने म्हटले आहे. ट्विट्सचा हा आकडा गेल्यावर्षांच्या तुलनेत दीड लाखांहून अधिक वाढला आहे. शुभेच्छा किंवा प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाबद्दल माहिती देणारे एकूण ९ लाख ट्विट गेल्यावर्षी करण्यात आले होते. हा आकडा यावर्षी ११ लाखांपर्यंत पोहोचला असल्यामुळे गेल्यावर्षीचा आपला रेकॉर्ड भारताने मोडला आहे.
२६ जानेवारीला जगभरातील ट्विटरवर ट्रेंडमध्ये होते प्रजासत्ताक दिनाचे हॅशटॅग
भारताने या प्रजासत्ताक दिनाला आसिआन देशातील १० राष्ट्रप्रमुखांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. पहिल्यांदाच भारताच्या इतिहासात प्रजासत्ताक दिनाला दोन पेक्षा अधिक देशांच्या राष्ट्रप्रमुखांना पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भारताच्या लष्करी सामर्थ्यांचे दर्शन घडवणारा हा दिमाखदार सोहळा पार पडला. देशभरातून यानिमित्ताने ट्विटच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला गेला.
६९ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ट्विटरनेदेखील खास इमोजी आणले होते. #HappyRepublicDay, #RepublicDay, #RepublicDay2018 असे हॅशटॅग वापरल्यावर त्यासोबत इंडिया गेटचा इमोजी दिसत होता. सर्वांनाच ट्विटरची ही कल्पना खूप आवडली होती.