देशातील पहिला पारदर्शक पूल माळशेज घाटात


ठाणे : फक्त महाराष्ट्रच नाही, तर देशभरातील पर्यटकांना माळशेज घाटातील निसर्ग सौंदर्याची भुरळ पडली असून आता जगाच्या नकाशावर माळशेजचे हे सौंदर्य आणण्याच्या हालचाली सुरु आहेत. माळशेज घाटात लवकरच देशातला पहिला पारदर्शक पूल (वॉक वे) बांधण्यात येणार आहे.

ठाणे जिल्हा प्रशासनाने माळशेज घाटातील ७०० मीटर खोल दरीवर १८ मीटर लांबीचा पारदर्शक वॉक-वे बांधण्याचा प्रस्ताव मांडला आहे. हे स्वप्न प्रस्ताव आणि बजेटला मंजुरी मिळाल्यास येत्या तीन वर्षांत प्रत्यक्षात उतरेल आणि तसे झाल्यास हा देशातील पहिला पारदर्शक पूल ठरेल.

एमआरटीडीसीचे कल्याण-अहमदनगर हायवेवर माळशेजमध्ये रिसॉर्ट आहे. त्याच्या जवळच माळशेजच्या दरीलगत दुमजली इमारत बांधण्यात येणार असून त्यावर हा पारदर्शी वॉक वे असेल. १८ मीटर लांबीचा यू-शेप वॉक वे बांधण्याची प्रशासनाची योजना आहे. वॉक वेचे फ्लोरिंग पारदर्शी (काचेचे) असेल. पर्यटकांना या वॉक वे वरुन चालताना हवेत चालण्याचा अनुभव अनुभवता येईल. त्याचबरोबर खोल दरीचा नयनरम्य नजारा पाहता येईल आणि अर्थात डेकवर (काळजी घेऊन) फोटो काढण्याचीही मुभा असेल.

ही योजना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने दोन टप्प्यात प्रत्यक्षात आणायची आहे. वॉक वेचे बांधकाम पहिल्या टप्प्यात, तर आर्ट गॅलरी, अॅम्पिथिएटर, म्युझिकल फाऊण्टन्स याची रचना दुसऱ्या टप्प्यात करायची आहे. हा प्रस्ताव आमदार किसन कथोरे यांनी मांडला असून ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे.

Leave a Comment