३१ मार्चपासून बंद होणार जिओच्या मोफत सेवा!


नवी दिल्ली : एकीकडे आपल्या ग्राहकांसाठी रिलायन्स जिओ नव-नवे प्लान्स लॉन्च करत आहे. तर, दुसरीकडे जिओने आपल्या प्राईम युजर्ससाठी एक वाईट बातमी दिली आहे. जिओची प्राईम मेंबरशिप ३१ मार्च २०१८ ला संपत आहे.

जिओ प्राईम मेंबरशिप २१ फेब्रवारी २०१७ रोजी मुकेश अंबानी यांनी लॉन्च केली होती. ३१ मार्च २०१७ ही मेंबरशिप घेण्याची शेवटची तारीख होती. कंपनीने त्यानंतर ही तारीख वाढवून १५ एप्रिल २०१७ केली होती. या प्राईम मेंबरशिपची वैधता १ वर्ष होती. जर तुम्ही १४ एप्रिल २०१७ रोजी मेंबरशिप घेतली असेल तर ३१ मार्च २०१८ रोजी तुमची मेंबरशिप संपेल.

जिओ प्राईम मेंबरशिपसोबत ग्राहकांना जिओ अॅप्स म्हणजेच जिओ टीव्ही, जिओ म्युझिक, जिओ सिनेमासारख्या १०,००० रुपयांचे अॅप्स या सेवा मोफत मिळत होत्या. ग्राहकांनी यासाठी ९९ रुपये देत प्राईम मेंबरशिप घेतली होती. या मेंबरशिपसोबतच ग्राहकांना जिओचा एक बेस्ट प्लान खरेदी करावा लागला होता.

अद्याप युजर्सला कंपनीकडून मेंबरशिप संपल्यावर काय करावे? याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सूत्रांच्या मते, ही मेंबरशिप चालू ठेवण्यासाठी युजर्सला पुन्हा प्लान खरेदी करावा लागणार आहे. पण त्याचसोबत जिओ प्राईम मेंबरशिपची रक्कम कंपनी वाढवू शकते.

जिओ प्राईम मेंबरशिपची अट होती की, ३१ मार्च २०१८ रोजी संपणार आहे. आता युजर्सने जेव्हा कधीही मेंबरशिप घेतली असेल तरी ती ३१ मार्च रोजीच संपेल. कंपनी या मेंबरशिपची वैधता ३१ मार्चनंतर वाढवू शकते. मात्र, यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तसेच नव्या प्लानच्या किंमतीतही वाढ होऊ शकते. असे झाल्यास युजर्सला जास्त पैसे खर्च करण्यास तयार रहावे लागेल.

Leave a Comment