येस बँक आणणार आगळेवेगळे एटीएम


नवी दिल्ली : एक आगळेवेगळे एटीएम खासगी क्षेत्रातील येस बँक आणणार असून हे एटीएम वापरण्यासाठी ग्राहकांना ना पिनची, ना एटीएम कार्डची गरज भासणार आहे. एका नव्या तंत्रासाठी येस बँकेने जो करार केला आहे, त्यामुळे हे शक्य होणार आहे.

फिनटेक क्षेत्रातील कंपनी नियरबाय टेकसोबत येस बँकेने करार केला असून ही कंपनी कार्ड आणि पिनची गरज नसणारे एटीएम देणार आहे. ग्राहक रिटेलर्सकडेच पैसे जमा करु शकतील आणि तिथूनच पैसे काढूही शकतील. ही सेवा सुरु करण्यासाठी नियरबायने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी मिळूनही काम केले आहे.

स्मार्टफोनवरही पे नियरबाय अॅपचा वापर करता येईल. यामुळे काही रिटेलर्स ग्राहकांसाठी आधार-एटीएम आणि आधार बँक शाखेच्या रुपात काम करु शकतील. कॅश जमा करणे किंवा काढण्याची सुविधा यातूनच मिळेल, असे येस बँकेने म्हटले आहे. आधार नंबर आणि फिंगरप्रिंटचा वापर करुन ग्राहक पैसे काढू शकतील किंवा इतर व्यवहार करता येतील.

Leave a Comment