झुकेरबर्गचे ‘फेसबुक स्वच्छता अभियान’


नवीन वर्षाचा जरा वेगळा संकल्प फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी जाहीर केला आहे. त्यांनी फेसबुकचा दुरुपयोग होण्यापासून रोखण्याचा संकल्प केला आहे. झुकेरबर्ग २००९ पासून नवीन वर्षाचा संकल्प जाहीर करत आहेत. एका पोस्टद्वारे फेसबुकवरच त्यांनी २०१८चा संकल्प जाहीर केला आहे. यंदाचा संकल्प आधीच्या संकल्पांपेक्षा वेगळा आहे.

फेसबुकवरून अमेरिका आणि इतर देशांच्या निवडणुकीत तथाकथित खोट्या बातम्या पसरल्या गेल्या, अशी टीका फेसबुकवर झाली. विशेषत: २०१६मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत रशियाच्या बाबतीत राजकीय जाहिराती फेसबुकवर प्रसिद्ध झाल्या होत्या.
यावर्षीच्या काही ‘महत्त्वाच्या मुद्द्यांची’ यादी झुकेरबर्ग यांनी तयार केली आहे. यावेळी शिवीगाळ आणि द्वेषापासून लोकांना दूर ठेवणे, सरकारकडून होणाऱ्या हस्तक्षेपाविरोधात आवाज उठवणे, तसेच फेसबुकवर घालवलेला वेळ कसा सत्कारणी लावता येईल याचा विचार करणे अशा मुद्द्यांवर विचार होईल, असे त्यांनी सांगितले आहे.


सगळ्या त्रुटी आणि शिवीगाळ पूर्णपणे आम्ही थांबवू शकणार नाही, पण सध्या फेसबुकडून भरपूर चुका होत आहेत. त्यामुळे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा गैरवापर केला जात आहे, असे त्यांनी लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. हे सगळे साध्य झाले तर २०१८चा अखेर चांगल्या पद्धतीने होऊ शकेल, असंही झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे. फेसबुकमध्ये वेगळे काही करण्यापेक्षा सध्या असलेल्या आव्हानांचा बारकाईने अभ्यास केला जाणार आहे..

झुकेरबर्ग यांचा २०१८चा संकल्प म्हणजे… फेसबुकचे संस्थापक म्हणून त्यांना जे काम करावेच लागणार आहे त्यासंदर्भातलाच आहे, अशा आशयाचे ट्वीट तंत्रज्ञानावर लिहिणाऱ्या माया कोसॉफ्फ यांनी केले आहे.

Leave a Comment