मसाल्याच्या निर्यातीत सतत वाढ


भारतातून चहा, कॉफी आणि मसाले यांची मोठी निर्यात होते कारण भारत हा मसाल्याचे पदार्थ तयार करणारा सर्वात मोठा देश आहे. केवळ तयार करण्यातच नाही तर वापरण्यात आणि निर्यात करण्यातही भारत आघाडीवर आहे. मसाले ही खायची वस्तू असल्याने त्याच्या व्यापारावर अनेक बंधने आहेत. या बाबत काही निकष ठरवण्यात आले असून त्या निकषांनुसार जगात १०९ वस्तूंचाच वापर करणे वैध ठरवण्यात आले आहे. या मान्यताप्राप्त १०९ पदार्थांपैकी ७५ पदार्थ भारतात तयार होतात आणि जगभर निर्यात होतात. एवढ्या मोठ्या संख्येने मसाले तयार करणारा भारताशिवाय अन्य कोणताही देश नाही. जगात मसाल्यांचा जेवढा व्यापार होतो त्यापैकी ५०टक्के व्यापार एकट्या भारतात होत असतो.

भारताचा मसाल्याचा व्यापार अमेरिका, चीन, व्हियतनाम, ब्रिटन, अरब अमिराती, इंडोनेशिया, मलेशिया, सौदी अरबस्तान आणि जर्मनी यांच्याशी आहे. भारताएवढे शुद्ध मसाल्याचे पदार्थ अन्य देशात तयार होत नाहीत आणि त्यांचा सुवास अनेक देशांत पसंत केला जातो. शिवाय भारतीय मसाल्यात अनेक औषधी गुण आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षात भारताची मसाल्याची निर्यात वाढत चालली आहे. या मसाल्याच्या पदार्थात मेथी, धने, हळद, विलायची, लवंग, दालचिनी, मिरची, जिरे, मिरे, हिंग यांचा प्रामुख्याने समावेश आहे. गेल्या दोन वर्षात जागतिक मंदी आणि आयातदार देशांत लावण्यात आलेले अनेक कडक नियम यामुळे मसाल्याची भारताची निर्यात मंदावेल असे वाटले होते पण जुलै ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत या निर्यातीत २४ टक्के वाढ झाली आहे.

गेल्या दोन तिमाहीतल्या निर्यातीच्या आकड्यांवरून बराच गोंधळ माजला आहे कारण काही प्रमाणात ती कमी झाली आहे पण मसाल्यांनी मात्र कायम वाढच नोंदवली आहे. गेल्या तिमाहीत निर्यात सरासरीने २४ टक्के वाढली असली तरी मिरचीच्या बाबतीत ती ४२ टक्के आहे.जगात भारताशिवाय कोठेही मिरची फारसी खाल्ली जात नाही असे म्हटले जात असतानाच भारतातून मिरचीची निर्यात एवढी वाढली आहे. गेल्या तीन महिन्यांत भारतातून विविध ेदेेशांत २ लाख ३५ हजार टन मिरची परदेशांत निर्यात झाली आहे. यातून भारताला २१२५ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले. मिरचीच्या पाठोपाठ जिर्‍यांची निर्यात झाली असून ती १३२४ कोटी रुपयांची आहे. अशाच प्रकारे अन्यही पदाथार्र्ंच्या निर्यातीत भारताने आघाडी घेतली आहे.

Leave a Comment