ह्युमन्स ऑफ हिंदुत्व फेसबुक पेज हिंदुत्ववाद्यांच्या धमक्यांमुळे बंद


काही हिंदुत्ववाद्यांनी दिलेल्या धमक्यांमुळे ह्युमन्स ऑफ हिंदुत्व हे फेसबुकवरील लोकप्रिय पेज बंद करण्यात आले असून या पेजच्या अॅडमिनिस्ट्रेटरने काल गुरुवारी हा निर्णय घेतला. काही माथेफिरूंच्या हाती विडंबनामध्ये माहीर असलेल्या या पेजकर्त्याचा फोन नंबर लागल्याचे एका पत्रकाराने ट्विट केले. या फोनवर अॅडमिनिस्ट्रेटरला ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. आपल्याला पत्नी व मुलांची चिंता वाटत असल्याने हे पेज आपण बंद करत असल्याचे त्याने आपल्या पत्रकार मित्राला सांगितले.

या प्रकरणी भाष्य करताना खेदाने एका पत्रकाराने विनोद हा या देशात कुणाला समजत नाही असे मत व्यक्त केले आहे. एक लाखापेक्षा जास्त ह्युमन्स ऑफ हिंदुत्व या पेजला लाइक्स होते. ह्युमन्स ऑफ हिंदुत्व धार्मिक दहशतवाद, नैतिकतेचा आग्रह धरणारे स्वयंघोषित नेते, गोरक्षक आणि अंधश्रद्धा यांच्याविरोधात सातत्याने उपहासात्मक लिखाण करत असे.

दी वायर या वेबसाइटने याबाबत दिलेल्या वृत्तात मी स्वत:हून पेज बंद करत आहे, मला बॅन करण्यात आलेले नाही असे पेजच्या अॅडमिनिस्ट्रेटरने म्हटले आहे. जीवे मारण्याच्या धमक्या मला आल्या असून त्याकडे मी दुर्लक्ष करू शकत नाही असेही अॅडमिनिस्ट्रेटरने नमूद केले आहे. मी मध्यमवर्गीय आहे, भाजपशासित राज्यात राहतो आणि मला राजकीय पाठबळ नाही असे सांगत या पेजकर्त्याने पेज बंद करण्याचा मार्ग निवडला आहे.

Leave a Comment