
नवी दिल्ली : टेलिकॉम कंपन्यांमध्ये रिलायन्स जिओच्या धमाकेदार प्लान्सनंतर ऑफर्स देण्याच्या स्पर्धाच सुरु झाल्या आहेत. जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने नवा प्रीपेड प्लान सादर केला आहे तर, दुसरीकडे आयडिया कंपनीनेही आपला जबरदस्त प्लान लॉन्च केला आहे.
आयडिया आणि एअरटेलने लॉन्च केला जबरदस्त प्लान
नुकतेच प्रीपेड प्रॉमिस स्किमनुसार एअरटेल कंपनीने नवा प्लान लॉन्च केला आहे. कंपनीने यामध्ये ग्राहकांना ४४८ रुपयांत ७० दिवसांसाठी एक जीबी इंटरनेट डेटा देत आहे. एअरटेलने रिलायन्स जिओच्या ९८ रुपयांच्या प्लानला टक्कर देण्यासाठी ९३ रुपयांचा रिचार्ज प्लान सादर केला आहे. ग्राहकांना यामध्ये अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल्स ज्यामध्ये रोमिंग, १० दिवसांसाठी एक जीबी डेटा मिळणार आहे. तसेच या पॅकमध्ये दररोज १०० एसएमएस फ्री मिळणार आहेत. हा रिचार्ज प्लान २जी, ३जी आणि ४जी स्मार्टफोन्सवरही करता येणार आहे.
आयडिया कंपनीने देखील आपल्या सध्याच्या ३०९ रुपयांच्या प्लानला अपग्रेड केले असून यानुसार, आता ग्राहकांना २८ दिवसांसाठी दररोज १.५ जीबी इंटरनेट डेटा मिळणार आहे. युजर्सला या प्लानमध्ये अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल्सची सुविधा मिळणार आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉल्ससाठी नियम लागू आहेत.
या प्लानमध्ये युजर एका दिवसासाठी जास्तीत जास्त २५० मिनिट फ्री बोलू शकतो. आठवड्याला ही मर्यादा एक हजार मिनिटांची आहे. जर युजर्स दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक बोलल्यास त्याला प्रत्येक कॉलसाठी एक पैसा प्रति सेकंद या दराने पैसे द्यावे लागणार आहेत.
