शिपिंग कंटेनरमध्ये झाली कुलभूषण जाधव यांची मातृभेट


इस्लामाबाद – पाकिस्तानने सोमवारी कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांना काचेच्या पलीकडून भेटू देण्याचे नाटक पार पाडले. पण सांगितल्याप्रमाणे हे नाटक देखील पाकिस्तानच्या सरकारी इमारतीत न करता चक्क पार्किंग लॉटमधील एका शिपिंग कंटेनरमध्ये केल्याचा गौप्यस्फोट इंडिया टुडेने केला आहे. सोमवारी कुलभूषण जाधव यांची आई व पत्नीशी भेट झाली. जाधव यांना भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना पाकिस्तानने भेटू दिले नाही.

जाधव यांना त्यामुळे कुटुंबियांना तब्बल २२ महिन्यांनी भेटता आले. पाकिस्तानने ती भेटही बंद खोलीत करण्याचा मोठेपणा दाखवला नाही आणि काचेच्या पलीकडे केवळ एकमेकांना दर्शनाचा लाभ घेता आला. या भेटीचे फोटो ज्यावेळी प्रसारमाध्यमांमध्ये आले त्यावेळी जाधव यांच्या डोक्याला दुखापत झाल्याचे जाणवत होते. त्यांचे हाल करण्यात आल्याचे मानण्यास पुरेशी जागा आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याच्या आघा शाही येथील पार्किंग लॉटमध्ये असलेल्या शिपिंग कंटेनरमध्ये किंवा जहाजावर असतात त्या भल्या मोठ्या कंटेनरमध्ये ही भेट घडवण्यात आली आणि सरकारी इमारतीमधील खोलीमध्ये भेट घडवल्याचा आव पाकिस्तानकडून आणण्यात आला. याबाबत इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार तीन भागात हा कंटेनर विभागला होता. यामध्ये साउंड प्रूप भिंती उभारण्यात आल्या होत्या. स्पीकरच्या माध्यमातून जाधव व त्यांच्या आई व पत्नी यांनी संवाद साधला.

Leave a Comment