संघाच्या कार्यशाळेला गैरहजर राहणाऱ्यांना भाजप पाठवणार नोटीस


नागपूर : भाजप नागपूरच्या रेशीमबाग स्मृती मंदिरात भाजप आमदारांच्या कार्यशाळेला गैरहजर राहणाऱ्यांना नोटीस बजावणार असल्याची माहिती पक्षाच्या अधिकृत सूत्रांनी नागपुरात दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांच्यासह दिग्गज नेते आज सकाळी रेशीमबागेत दाखल झाले. मात्र, यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील आणि वेगळ्या विदर्भाचा नारा देणारे आशिष देशमुख मात्र गैरहजर होते.

कार्यशाळेला अनुपस्थित राहिलेल्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा मानणाऱ्या भारतीय जनता पक्ष नोटीस तर बजावणार आहे, पण त्यांच्यावर नेमकी कारवाई काय करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण खडसेंसारखे ज्येष्ठ नेत्यांचाही अनुपस्थित राहणाऱ्यांमध्ये समावेश आहे.

यात खडसे, रणजित पाटील किंवा आशिष देशमुख अनुपस्थित राहिले असले, तरी राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा आणि राज्याचे पदुम मंत्री महादेव जानकर हे मात्र उपस्थित होते. दरम्यान, भाजप आमदार आशिष देशमुखांनी वेगळ्या विदर्भाची मागणी करत राजीनाम्याचाही इशारा दिला असल्यामुळे येत्या काळात काय हालचाली होतील, याची उत्सुकता राजकीय वर्तुळासह सर्वांनाच लागली आहे.

Leave a Comment