एअरटेलचा e-KYC परवाना रद्द


नवी दिल्ली : एअरटेल आणि एअरटेल पेमेंट बँकच्या e-KYC प्रक्रियेवर आधार प्राधिकरण अर्थात UIDAI ने तात्पुरती बंदी आणली आहे. एअरटेलचा e-KYC परवाना रद्द करण्यात आला आहे. एअरटेलवर e-KYC चा गैरवापर केल्याचा आरोप असल्याने ही कारवाई करण्यात आली.

भारती एअरटेलचा e-KYC परवाना तातडीने निलंबित करण्यात येत असल्याचे UIDAI ने जारी केलेल्या एका आदेशात म्हटले आहे. एखाद्या दूरसंचार कंपनीवर UIDAI ने एवढी मोठी कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. एअरटेलने सिम रिव्हेयरिफाय करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची परवानगी घेतल्याशिवायच त्यांचे खाते एअरटेल पेमेंट बँकेत सुरु केल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर पेमेंट बँक खात्याला एलपीजी सबसिडी मिळण्यासाठीही लिंक केले जात असल्यावर UIDAI ने गंभीर आक्षेप घेतला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, ३१ मार्च २०१८ पर्यंत सर्व ग्राहकांना त्यांचा मोबाईल नंबर आधारशी लिंक करायचा आहे. यासाठी जी e-KYC प्रक्रिया आहे, ती एअरटेलच्या ग्राहकांना करता येणार नाही. केवळ आधार नोंदणी केंद्रावर जाऊनच ही प्रक्रिया करता येईल.

UIDAI ने एअरटेलच्या e-KYC वर घालण्यात आलेली ही बंदी कधीपर्यंत राहिल, याबाबत काहीही स्पष्टीकरण न दिल्यामुळे एअरटेल पेमेंट बँकेच्या ग्राहकांना त्यांचे खाते आधारशी लिंक करण्यासाठीही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

Leave a Comment