महागणार अॅपल, मायक्रोमॅक्स आणि लेनोव्होचे फोन


नवी दिल्ली : केंद्र सरकारने मोबाईल फोनसोबतच टीव्हीवरील आयात शुल्क वाढवल्यामुळे मोबाईल फोनमध्ये आयफोनचे बरेच मॉडेल महागण्याची शक्यता आहे. याच प्रकारे वाढ ओव्हन आणि वॉटर हिटरवरही करण्यात आली आहे.

याबाबतची माहिती अर्थमंत्रालयाने अधिसूचना जारी करत दिली आहे. १० टक्क्यांहून १५ टक्के मोबाईलवर असलेले आयात शुल्क करण्यात आले आहे. हे नवे दर लागू झाले असल्यामुळे आता मोबाईल खरेदी करताना जास्त किंमत मोजावी लागणार आहे.

मोबाईल मार्केट क्षेत्रातील संस्था काऊंटरपॉईंटच्या आकडेवारीनुसार, २०१७ मध्ये २८ कोटी मोबाईल हँडसेट विकण्याची शक्यता आहे. यापैकी ८० टक्के फोन मेक इन इंडिया आहेत, तर उर्वरित २० टक्के फोन इतर देशांमधून आयात केलेले आहेत. आयात होणाऱ्या फोनमध्ये अॅपल, मायक्रोमॅक्स आणि लेनोव्होच्या जास्त फोनचा समावेश आहे.

भारतात अॅपलचे विकले जाणारे जवळपास ८८ टक्के फोन आयात केले जातात. त्यामुळे अॅपलला एकतर किंमत वाढवावी लागेल किंवा त्याची निर्मिती भारतातच सुरु करावी लागेल. मायक्रोमॅक्स आणि लेनोव्होने भारतात फोन निर्मिती करण्याची तयारी पूर्ण तर केलेली आहे, पण काम प्रत्यक्षात न सुरु झाल्यामुळे आता या नव्या निर्णयानंतर दोन्ही कंपन्या उत्पादन सुरु करतील, अशी अपेक्षा आहे.

Leave a Comment