सोशल मीडियात शशी कपूरऐवजी नेटक-यांनी वाहिली शशी थरूर यांना श्रद्धांजली


सोमवारी दीर्घ आजाराने बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांनी आपल्या लाडक्या अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली, पण यात एक मोठी गफलत झाली. श्रद्धांजली वाहण्याच्या नादात काही नेटक-यांनी चुकून काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनादेखील श्रद्धांजली वाहिली. सांत्वन करणारे फोन थरूर यांच्या कार्यालयात येऊ लागल्यानंतर थरूर यांनी शेवटी ट्विट करत माझ्या मरणाच्या बातम्या प्रसिद्ध होत असल्या तरी मी ठणठणीत बरा असल्याचे ट्विट करत लोकांना चूक निदर्शनास आणून दिली.


एका इंग्रजी वृत्तवाहिनीने ब्रेकिंग न्यूज देण्याच्या नादात शशी कपूर यांच्याऐवजी शशी थरूर यांच्या निधनाची बातमी दिल्यामुळे हा सगळा घोळ झाला. यावर पडदा टाकण्यासाठी शशी थरूर यांनी ट्विट करत मी ठणठणीत बरा असून माझ्या कार्यालयात अनेक पत्रकारांचे फोन येत आहे. पण अजूनही मी जिवंत आहे. मला वाटते आता फक्त माझ्या शरीराचा एक भाग निकामी झाला आहे. एका चांगल्या, देखण्या चतुरस्त्र अभिनेत्याचे आज निधन झाले, माझे आणि त्यांचे नाव एकसारखे असल्याने लोकांमध्ये नेहमीच संभ्रम निर्माण होतो. पण, मला शशी कपूर यांची आठवण नेहमीच येत राहिल असे म्हणत त्यांनी आपल्या निधनाच्या बातमीला पूर्णविराम लावला.


शशी थरूर यांना फक्त वृत्तवाहिनीच नाही तर अनेक नावाजलेल्या लोकांनीही शशी कपूरऐवजी श्रद्धांजली वाहिली. अखेर थरूर यांच्या ट्विटनंतर सगळ्यांनी त्यांची माफी मागत हे प्रकरण तिथेच थांबवले.

Leave a Comment