मनुका- आरोग्यदायी सुका मेवा


सुक्या मेव्याच्या सेवनाचे अनेक फायदे आयुर्वेदात सांगितले जातात. त्यापैकी आकाराने छोट्या, रंगाने काळ्या असणार्‍या मनुका या शरीरासाठी अनेक प्रकारचे लाभ देणार्‍या आहेत. लहान थोर कुणीही सहज पचवू शकेल अशा या मनुका आरोग्याच्या लहानमोठ्या समस्यांवरचा रामबाण उपाय आहेत.

अनेकांना पित्ताचा त्रास होतो. अशा लोकांनी मनुका रात्रभर पाण्यात भिजत घालून सकाळी ते पाणी प्यायले तर पित्ताचा त्रास कमी होतो. भिजलेल्या मनुका चावून खाल्याने पोट साफ होण्यास मदत मिळते. मनुकांमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते तसेच संधिवात, हाडे पोकळ होण्यामुळे उद्भभवणार्‍या समस्या दूर होतात. ज्यांना हाडांच्या तक्रारी आहेत त्यांनी दररोज मनुकांचे सेवन करणे लाभदायक आहे.


मनुका पोटॅशियम व मॅग्नेशियमचा चांगला स्त्रोत आहेत. किडनी स्टोन, हृदयरोग यासारख्या विकारांवर त्या उपयुक्त आहेत. शरीरातील विषजन्य पदार्थांचा निपटारा त्यांच्यामुळे होतो. मीठ, मनुका व काळे मिरे गरम करून चावून खाल्यास भूक वाढते तसेच जुन्या तापात अनेकदा भूक कमी होते त्यावरही हा उपाय चांगला परिणाम देतो. ज्यांना कमी रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनाही मनुका लाभदायक आहेत. मीठासह मनुकांचे सेवन केल्यास रक्तदाब नियंत्रित राहतो.

पोट साफ होण्यासाठी अथवा ज्यांना बद्धकोष्ठतेचा विकार आहे त्यांनी रात्री झोपताना मनुका व बडीशेप चावून खावी. सर्दी पडसे, घसा खराब होणे यावरही रोज मनुकांचे सेवन केले तर हे त्रास दूर होतात. मनुका घशांसंबंधीचे बहुतेक सर्व विकार बरे करण्यास मदत करतात.

Leave a Comment