मिस आर- नवी इलेक्ट्रीक सुपरकार


जगभरातील वाहन उत्पादक कंपन्या प्रदूषण कमी करणार्‍या वाहनांवर संशोधन करत असून नवनव्या इलेक्ट्रीक कार बाजारात आणत आहेत. इलेक्ट्रीक कार उत्पादक बडी कंपनी टेस्लाने त्यांची रोडस्टर ही एका चार्जमध्ये १ हजार किमी अंतर कापणारी कार सादर केली असतानाच तैवानची राजधानी तैपेई येथील झिंग मोबिलिटी या कंपनीने मिस आर नावाची सुपरकार तयार केली आहे. या कारच्या चाचण्या सध्या सुरू आहेत व पुढच्या वर्षात ती बाजारात येईल. अर्थात कंपनी अशा फक्त २० कार बनविणार आहे. या कारची किंमत निश्तत करण्यात आली आहे. या कारची किंमत आहे १० लाख डॉलर्स.

या कारची खासियत अशी की तिला दिलेल्या चार मोटरमुळे १ मेगावॉट पॉवर जनरेट होऊ शकते. ही कार १.८ सेकंदात ० ते १०० किमीचा वेग घेते आणि तिचा टॉप स्पीड आहे ताशी ३०० किमी. इलेक्ट्रीक कार्सही वेगाने धावू शकतात हे जगाला दाखवून देण्यासाठी ही कार तयार केली गेल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. तसेच ही कार रोडस्टरपेक्षाही वेगवान असल्याचा कंपनीचा दावा आहे. या कारच्या ऑनरोड, ऑफ रोड चाचण्या सुरू आहेत मात्र कारचे फोटो प्रसिद्ध केले गेले आहेत. ही कार २०० किमीचा वेग ५ सेकंदात घेते. कार तापल्यामुळे दुर्घटना होऊ शकते ही शक्यता लक्षात घेऊन तिची बॅटरी सुरक्षित बनविण्याची खास सोय केली गेली आहे. त्यासाठी युनिक लिक्विड कूलिंग सिस्टीम बसविली गेली आहे. यामुळे इंजिन व बॅटरी थंड राहण्यास मदत होते.