
तुम्हाला फेसबुकवर खूप फ्रेंड असतील, तर तुम्हाला चंगळवाद आणि भौतिकवादात जास्त रस असण्याची खूप शक्यता आहे, असे शास्त्रज्ञांनी केलेल्या एका पाहणीतून दिसून आले आहे. ज्यांचे फेसबुकवर जास्त मित्र असतात, ते आपल्या मित्रांकडे मौल्यवान वस्तू म्हणून पाहतात, असे या पाहणीत दिसून आले आहे.
फेसबुकवर खूप फ्रेंड म्हणजे चंगळवादाचे लक्षण
भौतिकवादी लोकांना अ-भौतिकवादी लोकांच्या तुलनेत फेसबुकवर अधिक मित्र असतात, असे अभ्यासकांना आढळले. हे लोक अ-भौतिकवादी लोकांपेक्षा फेसबुकवर अधिक वेळ घालवतात. तसेच ते सोशल मीडियावरील अन्य लोकांच्या तुलनेत दुसऱ्या लोकांच्या आयुष्याशी तुलनाही जास्त करतात, असेही त्यांना दिसून आले आहे.
जर्मनीतील रूहर-युनिव्हर्सिटी बोखम या विद्यापीठातील फिलीप ओझिमेक यांच्या नेतृत्वाखालील चमूने हे संशोधन केले आहे. या घटनेची कारणमीमांसा करण्यासाठी ‘सोशल ऑनलाईन सेल्फ-रेग्युलेशन थेअरी’ नावाचा एक नवीन सिद्धांत मांडला आहे.
या संशोधकांनी 531 फेसबुक वापरकर्त्यांच्या प्रोफाईलचा अभ्यास केला. त्यांना प्रश्नपत्रिका पाठवून त्यांच्याकडून माहिती मागविण्यात आली.
मात्र भौतिकवादी लोकांकडून फेसबुकचा ज्या प्रकारे वापर करण्यात येतो, त्यात काहीही चूक नसल्याचे ओझिमेक व त्यांच्या सहकाऱ्यांनी म्हटले आहे. हेलियोन या संशोधन नियतकालिकात हे संशोधन प्रकाशित झाले आहे.
