आधार कार्ड-मोबाइल क्रमांकाची जोडणी आता १ डिसेंबरपासून घरबसल्या करा


नवी दिल्ली – आधार कार्डसोबत तुमचा मोबाइल फोन लिंक झाला आहे का? तुम्हाला हे लिंक करण्यासाठी स्टोअरमध्ये जाण्याचा कंटाळा आल आहे का ? तर लवकरच मग तुमची ही कटकट मिटणार आहे. मोबाइल फोनधारकांना १ डिसेंबरपासून आधार कार्ड आधारित सिम कार्ड पुन्हा पडताळण्यासाठी टेलिकॉम कंपनीच्या स्टोअरपर्यंत जाण्याची गरज नाही. कारण ही प्रक्रिया आता तुम्ही घरबसल्याही करू शकणार आहात.

टेलिकॉम कंपन्यांकडून सादर करण्यात आलेले मॉडेल युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI)ने स्वीकारले आहे. आधारद्वारे जारी करण्यात आलेल्या सिम कार्डची पुन्हा पडताळणी करण्यासाठी यामध्ये ओटीपीसारख्या पर्यांयांचा समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भातील वृत्त इकनॉमिक टाइम्सने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचे सीईओ अजय भूषण पांडे यांनी सांगितले आहे की, लोकांना याद्वारे टेलिकॉम स्टोअरमध्ये न जाता घरबसल्या आपला मोबाइल फोन आधार कार्डसोबत लिंक करण्यासाठी व पडताळणीसाठी मदत मिळणार आहे.

गेल्या महिन्यात कंपन्यांना एसएमएसद्वारे ओटीपी, इंटरेक्टिव व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टम (IVRS) आणि टेलिकॉम कंपन्यांना मोबाइल अॅप्सद्वारे मोबाइल फोन क्रमांक पुन्हा पडताळणीसाठी टेलिकॉम डिपार्टमेंटने परवानगी दिली होती. आयरिस आधारित बायोमेट्रिक डिव्हाईसच्या माध्यमातून या विभागाने मोबाइल सिम कार्ड पडताळणीसाठी आणि ओटीपी किंवा अन्य पर्यायांचा उपयोग न करणा-या ग्राहकांच्या घरी जाऊन जोडणी प्रक्रिया पूर्ण करण्याचीही परवानगी दिली होती.

पांडे यांनी सांगितले की, मोबाइल फोन कंपनीच्या पोर्टलवर भेट देऊन ग्राहकांना आपला मोबाइल क्रमांक आणि आधार क्रमांक दिल्यानंतर रजिस्टर्ड मोबाइल क्रमाकांवर ओटीपी येईल. दुसरा पर्याय म्हणजे ऑपरेटर IVRS क्रमांक जारी करतील आणि ग्राहकांना त्यावर आपला आधार व मोबाइल क्रमांक द्यावा लागेल. त्यानंतर ओटीपी क्रमांकाचा मेसेज येईल आणि हा क्रमांक दिल्यानंतर पडताळणी केली जाईल.

Leave a Comment