शेतकऱ्यांना प्रति लिटर मुत्रासाठी मिळणार एक रूपया !


नवी दिल्ली – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशात प्रत्येक तहसील पातळीवर युरिन बँक स्थापन करण्याचा सल्ला दिला आहे. युरिन बँक प्रत्येक जिल्हा पातळीवर स्थापन करून युरिया त्यापासून तयार केला पाहिजे. ते शेतकऱ्यांना उर्वरक म्हणून वापर करण्यासाठी दिला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.

गडकरी यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सांगितले की, अजून प्राथमिक स्तरावर ही कल्पना असून हा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वीडनच्या काही शास्त्रज्ञांच्या साथीने प्रयत्न करत आहोत. मोठ्या प्रमाणात मनुष्याच्या मूत्रांत नायट्रोजन असते आणि ते वाया जाते. मी नेहमी टाकाऊपासून संपत्तीत रूपांतर करण्यासाठी प्रयत्नरत असतो. या कल्पनेवर काम केल्यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही, असे मला वाटते. आधीपासूनच आपल्याकडे फॉस्फरस आणि पोटॅशियमचा सेंद्रिय पर्याय उपलब्ध आहे. पण याची नायट्रोजनशी आपण सांगड घातली तर पिकांच्या विकासासाठी यामुळे योग्य घटक मिळतील, असेही ते म्हणाले.

या योजनेवर जर काम झाले तर १० लीटरच्या प्लास्टिक कॅनमध्ये शेतकऱ्यांनी मूत्र गोळा करावे आणि ते जिल्हास्तरावर असलेल्या केंद्रात जाऊन द्यावे लागेल, असे ते म्हणाले. सरकारकडून अशाप्रकारचे प्लास्टिक कॅन पुरवण्यात येतील. शेतकऱ्यांना प्रति लिटर मुत्रासाठी एक रूपया मिळेल. ग्रामीण भागातून ही चाचणी सुरू करता येईल. त्यानंतर एकत्र केलेले युरिन डिस्टिल करून शुद्ध केले जाईल म्हणजे यामुळे सेंद्रिय खत उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले.