बॅंकांना अद्यापही दोनशेच्या नोटांची प्रतीक्षा


पुणे – बॅंकांना दिवाळीत भारतीय रिझर्व्ह बॅंकेने पुरविलेल्या रेमीटन्समध्ये दोनशेच्या नव्या नोटा दिल्या. लक्ष्मीपूजनाकरिता नागरिकांनीही नव्या नोटा घेतल्या. पण दोनशेच्या नोटांचा पुरवठा मर्यादित झाला असल्यामुळे या नोटा व्यवहारातही मर्यादित स्वरूपात असून, येणाऱ्या रेमीटन्समध्ये दोनशेच्या नव्या नोटांच्या पुरवठ्याच्या प्रतीक्षेत बॅंकादेखील आहेत.

दरम्यान, पन्नास रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या आहेत. रिझर्व्ह बॅंकेने नोटाबंदीनंतर दोन हजार व पाचशेच्या नव्या नोटा चलनात आणल्या. दोनशेची नवी नोटही आता चलनात आली आहे; पण या नोटांचा पुरवठा मर्यादित असल्याने एटीएमवर त्या मिळत नाहीत, पण बॅंकांमध्ये मिळतात. दोनशेची नोट नव्या पाचशेच्या नोटेच्या तुलनेत आकाराने लहान आहे. अत्यंत आकर्षक अशी ही नोट असून तिचा रंगही उठावदार आहे. नोटेच्या चारही बाजूस सुरेख नक्षीकाम आहे. नोटेवर ऐतिहासिक वास्तूंचे छायाचित्रही पाहायला मिळते. पाकिटात सहज ठेवता येईल, अशी ही नोट आहे. त्यावर ‘स्वच्छ भारत अभियाना’संबंधी सूचनाही आहे. दोनशेच्या नोटा टप्प्याटप्प्याने रेमीटन्सद्वारे बॅंकांकडे येतील, ग्राहकांनाही त्यानुसार उपलब्ध होऊ शकतील. सध्या तरी उपलब्ध नोटांचा ग्राहकांच्या मागणीनुसार पुरवठा करीत आहोत, असे एक बँक अधिकाऱ्याने सांगितले.

Leave a Comment