दुस-यांदा जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले अ‍ॅमेझॉनचे जेफ बेझोस


न्यूयॉर्क : दुस-यांदा सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस हे समोर आले असल्याची माहिती वॉल स्ट्रीट जनरलने दिली आहे. अमेरिकेचा शेअर बाजार शुक्रवारी खुलताच अ‍ॅमेझॉनच्या शेअर्सनी १३.५ टक्क्यांपर्यंत उसळी घेतल्यामुळे ९० अब्ज डॉलरच्या पार बेझोस यांची संपत्ती गेली. तसेच ८९ अब्ज डॉलरच्या घरात बिल गेट्स यांची संपत्ती आहे.

ई-कॉमर्स क्षेत्रातील बलाढ्य कंपनी ‘अ‍ॅमेझॉन’चे सीईओ जेफ बेझोस हे गेल्या काही दिवसांपूर्वीसुद्धा काही तासांसाठी जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले होते. त्यांच्या कंपनीचे समभाग अचानक उसळल्यामुळे त्यांना श्रीमंतीच्या क्षेत्रातील औटघटकेचा राजा होण्याचे भाग्य लाभले होते. ही माहिती ‘फोर्ब्स’ नियतकालिकाने जारी केली होती. फोर्ब्सने म्हटले की, श्रीमंतीच्या क्षेत्रातील हा औटघटकेचा राजमुकुट जेफ बेझोस यांना मिळाला. अ‍ॅमेझॉनच्या समभागांनी उसळी घेतल्यानंतर कंपनीच्या एका समभागाची किंमत १,०८३.३१ डॉलर झाली होती. त्यामुळे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकून बेझोस हे पहिल्या क्रमांकावर पोहोचले होते. पण अ‍ॅमेझॉनचे समभाग त्यानंतर पुन्हा १ टक्क्याने घसरून १,०४६ डॉलरवर आल्यामुळे बोझेस हे पुन्हा दुस-या स्थानी जाऊन बिल गेट्स पहिल्या क्रमांकावर आले.

Leave a Comment