ताजमहालची लोकप्रियता राजकीय वादामुळे कमी झालेली नाही


नवी दिल्ली – ताजमहाल सध्या गेल्या काही दिवसांमध्ये सुरू असलेल्या राजकीय आक्रमणामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. उत्तर प्रदेशची सूत्रे योगी आदित्यनाथ यांनी हाती घेतल्यापासून ताजमहाल ही कायमच परकीय राज्यकर्त्यांची निशाणी असल्याचे सांगत या वास्तूला डावलण्याचा प्रकार सुरू आहे. उत्तर प्रदेश सरकारने त्याचाच एक भाग म्हणून प्रसिद्ध केलेल्या पर्यटनस्थळांच्या यादीतून ताजमहालला वगळण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच भाजप आमदार संगीत सोम यांनी ताजमहाल भारतीय संस्कृतीवरील कलंक असल्याचे म्हटले होते. त्यानंतर या मुद्द्यावरून देशातील राजकारण चांगलेच तापले आहे.

पण ताजमहालची लोकप्रियता या राजकीय वादामुळे तसूभरही कमी झालेली दिसत नाही. ताजमहाल हे सध्याच्या घडीला देशातील सर्वाधिक उत्त्पन्न मिळवून देणारे पर्यटनस्थळ आहे. ही बाब सांस्कृतिक मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या महसुलाच्या आकडेवारीवरून सिद्ध झाली आहे. याशिवाय केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी गेल्यावर्षी लोकसभेत सादर केलेली आकडेवारीही ताजमहालची लोकप्रियता स्पष्ट करण्यासाठी पुरेशी आहे.

ताजमहालामध्ये प्रवेशासाठी शुल्क आकारले जाते. ताजमहाल त्यानुसार देशातील सर्वाधिक उत्त्पन्न मिळवून देणारे पर्यटनस्थळ ठरले आहे. या आकडेवारीनुसार ताजमहालने २०१४-१५ मध्ये पर्यटनाच्या माध्यमातून २१.२३ कोटींची कमाई केली. त्यापाठोपाठ कमाईच्याबाबतीत आग्रा किल्ला ( १०.५८ कोटी), लाल किल्ला (५.९७४ कोटी) , हुमायूनची कबर ( ६.३५५५ कोटी) आणि कुतुबमिनार (१०.२९ कोटी) या पर्यटनस्थळांचा क्रमांक लागतो.

Leave a Comment