रतलामच्या महालक्ष्मीला सोन्याचा नैवेद्य


आपण दिवाळीला मध्यप्रदेशातल्या रतलाम येथील महालक्ष्मी मंदिराला भेट दिली तर आपल्याला महालक्ष्मीचे दर्शन होणे मुष्कील होते कारण या देवालयाचा गाभारा पैसे, दागिने, सोने, चांदी यांनी तुडुंब भरलेला असतो. या संपत्तीच्या ढिगामागे महालक्ष्मीची मूर्ती पूर्णपणे झाकली जाते. कारण या मंदिरात अनेक वर्षांपासून एक आगळी वेगळी परंपरा पाळली जात आहे. दिवाळी सुरू झाली की, या महालक्ष्मीचे भक्त आपल्या घरातले पैसे, सोने, चांदी आणि दागिने या मंदिरात आणून देतात. ही सारी संपत्ती ते तिथल्या पुजार्‍याच्या हातात देतात आति पुजारी ते सारे वैभव या मंदिराच्या गाभार्‍यात देवीच्या समोर ठेवून देतात. चार दिवस येेथे ही सारी संपत्ती ठेवली जाते आणि भाऊबीज होताच ती सारी संपत्ती ज्याची होती त्याला परत दिली जातेे.

आपला पैसा असा देवीजवळ ठेवल्याने नंतर आपल्याला वैभव प्राप्त होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे दिवाळी आली की, केवळ रतलामचेच नाहीतर परिसरातले अनेक लोकही या मंदिरात आपली संपत्ती आणून देतात. गेल्या पाच सहा वर्षात तर ही श्रद्धा एवढी बळावली आहे आणि लोकांकडे एवढा पैसा आला आहे की मंदिरापासून १०० किलो मीटर्स अंतरापर्यंतच्या गावातले लोकही आपले पैसे घेऊन मंदिराकडे धाव घेत आहेत. या वर्षी तर सुमारे १०० कोटी रुपयांचे सोने, पैसे आणि दागिने या मंदिरात ठेवले गेले आहेत. गाभार्‍यात आता हा पैसा ठेवायला जागा राहिलेली नाही. एवढ्या उघड्यावर ही सारी माया ठेवली गेली आहे. तिला कसलेही कुलूप नाही आणि पैसे ठेवल्याची पावतीही नाही.

या मंदिरात ठेवण्यात आलेल्या चीजवस्तूंची कधीही चोेरी होत नाही आणि कधीही पुजार्‍याला दिलेल्या वस्तूचा अपहार झालेला नाही. पुजारी कोणी वस्तू ठेवायला आले की त्यांच्याकडील रचिस्टरमध्ये त्यांचे नाव लिहून घेतात आणि त्याच्या नावापुढे वस्तूचे वर्णन लिहितात. आपली चीजवस्तू न्यायला कोणी आले की त्याची रजिस्टरमधील नोंद पाहून त्याला त्याची चीजवस्तू परत दिली जाते. एवढे असूनही पोलिसांनी या मंदिराला पहारा दिला आहे. पोलीस फार कसोशीने मंदिरातल्या सेवकांच्या हालचालीवर लक्ष ठेवून असतात. अनेक वर्षांची ही परंपरा आहे. आपल्या देशातल्या अनेक मठ मंदिरात प्रचंड प्रमाणात सोने आहे आणि ती मंदिरे संपन्न आहेत असे म्हटले जाते पण रतलामच्या या महालक्ष्मीच्या मंदिरात देवीच्या उपासकांकडे किती संपत्ती आहे याचे दर्शन आपल्याला दिवाळीत होत असते.

Leave a Comment