अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार रिचर्ड थेलर यांना जाहीर


स्टॉकहोम (स्वीडन): अमेरिकेचे अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड थेलर यांना यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला असून थेलर यांचा सन्मान व्यावहारिक अर्थशास्त्राच्या योगदानाबद्दल करण्यात आला.

थेलर यांचा अर्थशास्त्राचे मानसशास्त्र समजून सांगण्यात हातखंडा आहे, नोबेल समितीने त्याबद्दलही थेलर यांची निवड केली. १९४५ साली जन्मलेल्या रिचर्ड थेलर यांना वयाच्या ७२ व्या वर्षी नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले. रिचर्ड थेलर यांनी आर्थिक समस्या कशा दूर करता येतील, याबाबत सोप्या भाषेत पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक सर्वाधिक विक्री झालेल्या पुस्तकांपैकी एक आहे.

वैयक्तिक निर्णय क्षमतेचे आर्थिक आणि मानसशास्त्रीय विश्लेषण यांच्यातील दुवा म्हणून रिचर्ड थेलर यांचे काम मोठे असल्याचे नोबेल समितीने म्हटले आहे. रिचर्ड थेलर यांनी आर्थिक कुवत आणि मानसिक स्थिती यांच्यातील मानवी संभ्रमावस्थेबाबत केलेले विश्लेषण हे आर्थिक क्षेत्रात प्रमाण मानण्यात येते. भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजनही यंदा अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराच्या शर्यतीत होते. त्यामुळे या पुरस्काराकडे देशवासियांचे लक्ष लागले होते.

Leave a Comment