गणपतीने दिली बुद्धी


महाराष्ट्रातल्या गणपती मंडळांनी आपल्या वर्गणीचा दहावा हिस्सा सार्वजनिक कामाला द्यावा अशा धर्मादाय आयुक्तांनी केलेल्या आवाहनाला सक्रिय प्रतिसाद मिळाला असून राज्यातल्या काही मोठ्या मंडळांनी सात कोटी ५६ लाख रुपये आयुक्तांकडे जमा केले आहेत. शेवटी गणपती ही बुद्धीची देवता आहे. त्यामुळे मंडळांनी हे पैसे गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च करावेत अशी अपेक्षा या मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. आयुक्तांचीही अपेक्षाही तशीच होती. राज्यातल्या गरीब विद्यार्थ्यांना आता हा एक मोठा दिलासा आहे. गणेश मंडळांनी गणपतीने ही चांगली बुद्दी दिली आहे. या उदार देणगीबद्दल आणि सामाजिक भानाबद्दल या मंडळांचे अभिनंदन.

या निमित्ताने एक खंत व्यक्त करावीशी वाटते की या उपक्रमाला मिळालेला हा प्रतिसाद शंभर टक्के नाही. अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच निवडक मंडळांंनी हा १० टक्के निधी दिलेला आहे. राज्यातली गणेश मंडळे आणि त्याच्याकडे जमणारा एकुण निधी यापेक्षा किती तरी मोठा आहे. त्या सर्वांनी आपला १० टक्के हिस्सा शिक्षणाच्या कामासाठी द्यावयाचा निर्णय घेतला तर राज्यात दरसाल किती तरी मोठी रक्कम खर्च होईल. असा पैसा काही केवळ गणेश मंडळांचाच जमा होतो असे नाही तर नवरात्र मंडळांचा आणि अनेक जयंत्यांचाही जमा होत असतो. या सगळ्या उत्सवांच्या पदाधिकार्‍यांनी आपला १० टक्के निधी द्यायचे ठरवले तर राज्यात दरसाल किमान एक तरी विद्यापीठ उभे राहू शकेल. तेव्हा आता हाती आलेल्या ७.५६ कोटी रुपयांपासून प्रेरणा घेऊन आयुक्तांनी कामाला लागण्याचे ठरवले तर १० टक्के निधीतून चमत्कार घडेल.

आपण एकुणच धार्मिक कामावर किती तरी पैसा खर्च करीत असतो. मंदिरांचेही उत्पन्न मोठे मोठे असते. राज्यातल्या तुळजाभवानी मंदिराच्या अशा पैशातून अभियांत्रिकी महाविद्यालयही चालते. शिर्डीचे साईबाबा, पंढरपूरचा विठोबा, शेगावचे गजानन महाराज आणि अशाच काही मंदिरांनी आता आता काही चांगले उपक्रम हाती घेतलेही आहेत. अशा प्रयत्नांना एक सुस्पष्ट दिशा दिली आणि त्यांचा निधी नियोजनबद्दरीत्या विधायक कामाकडे गुंतवला गेला तर या पैशातून प्रचंड काम उभे राहू शकेल. शेवटी धर्म, तीर्थक्षेत्रे आणि तिथल्या देवता या लोकांच्या कल्याणार्थ असतात. त्यांचा पैसा असा लोकांसाठी खर्च झाला तर उलट तोच खर्च सत्कारणी ठरेल आणि तोच खरा धर्म ठरेल.

Leave a Comment