राजधानी फटाकेमुक्त


सर्वोच्च न्यायालयाने राजधानी दिल्लीतली यंदाची दिवाळी ही फटाकेमुक्त करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. गतवर्षी हा निर्णय दिलेला होता. पण, काही नागरिकांनी या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती करणारा अर्ज याच न्यायालयात दाखल केला होता. त्यावर गेल्या १२ सप्टेंबरला ही बंदी उठवण्याची मागणी करणारा अर्ज दाखल झाला. या अर्जाची सुनावणी करताना न्यायालयाने बंदी उठवली खरी पण ही बंदी उठवण्याचा निर्णय १ नोव्हेंबर पासून अंमलात येईल अशी पुस्ती जोडली. म्हणजे येत्या दिवाळीत फटाके उडणार नाहीत. कारण दिवाळी १९ तारखेला अर्थात १ नोव्हेंबच्या आधी येत आहे. दिल्ली शहरातले हवेचे प्रदूषण विचारात घेता हा निर्णय योग्यच आहे.

आपल्या देशात अशा निर्णयाकडे धर्माच्या चष्म्यातून पाहिले जाते. आता याही निर्णयाकडे तसेच पाहिले जात आहे आणि सोशल मीडियावर तशा प्रतिक्रियाही उमटायला सुरूवात झाली आहे. फटाके उडवणे हा दिवाळीतला आनंदाचा भाग आहे. तेव्हा त्यावर अशी बंदी घालणे हा हिंदुत्वाचा अपमान करणारा प्रकार ठरतो असे एका प्रतिक्रियेत म्हटले आहे. लगेच एक बिनतोड वाटणारा सवालही केला आहे. बकरी ईदलाही असेच प्रदूषण होते मग बकरी ईदमधील कुर्बानीवर अशीच बंंदी घालणार का असा सवाल या सायबर विचारवंताने केला आहे. खरे तर बकरी ईदमधील कुर्बानीने असे प्रदूषण मुळात होत नाही आणि झाले तरी एखादी सुधारणा हिंदूंवर लादली जायला लागली की, काही लोकांचा धर्माभिमान असा फणा काढून समोर येतो.

कोणत्याही धर्मामुळे प्रदूषण होओ पण ते निपटून काढलेचज पाहिजे. किंबहुना या बाबत हिंदू धर्मीय हे नेहमीच स्वागतशील आहेत. मुसिलांमध्ये तुलनेने नव्या गोष्टींचा स्वीकार होण्याची प्रवृत्ती कमी आहे. पण फटाक्यांनी होणारे नुकसान पाहिले तर हिंदूंनी आपली ही परंपरा मोठे प्रदूषण असलेल्या दिल्लीसारख्या शहरात तरी आवरती घ्यायला हवी कारण धर्म आणि त्यातल्या परंपरा आपल्या हितासाठी असतात. कधी काळी अशा प्रथा पडल्या तेव्हा लोकवस्ती दाट नव्हती आणि प्रदूषणाचे प्रश्‍नही गंभीर झालेले नव्हते तेव्हा त्या ठीक होत्या पण आता त्यांच्यामुळे माणसाच्या जीवाशी खेळ होत असेल तर त्या प्रथांचा आग्रह धरणे हे पूर्णपणे चुकीचे ठरेल. केवळ दिल्लीच नाही तर प्रदूषणाची पातळी उच्च असलेल्या अन्यही काही शहरात असाच निर्णय घेतला गेला पाहिजे. त्यात मुंबई, ठाणे. डोंबिवली याचा समावेेश होऊ शकेल.

Leave a Comment