साम्यवाद्यांची संस्कृती शरणता


साम्यवादी धर्माला अफूची गोळी मानतात. पण भारतीय माणूस धर्माला आपले पंचप्राण मानतो. साम्यवादी पक्ष हे तसे गरीब माणसाचे कैवारी पण तरीही गरिबांची संख्या मोठी असलेल्या या देशात साम्यवाद रुजला नाही. मुळातच साम्यवादाचा विचार हा अर्धवट आहे. त्यामुळे तर भारतातच काय पण जगात कोठेच हा विचार रूजला नाही. जिथे तो बळजबरीने रूजवायचा प्रयत्न झाला तिथे आता तो संपत चालला आहे. चीन आणि रशिया यांना तर साम्यवाद्याची मक्का मदिना म्हटले जायचे पण याही दोन देशांत आता साम्यवाद शिल्लक राहिलेला नाही. भारतातही त्यांची अशीच शोकांतिका झाली. आस्तिक देशात नास्तिक विचार रूजणार कसा? कधी कधी साम्यवादी मंडळंीना आपणही भारतीय जीवनाचे वास्तव स्वीकारले पाहिजे असे वाटते. ते तसा तो स्वीकारतातही पण मनापासून नाही.

योगाचे असेच झाले आहे. योग असो की अध्यात्म असो पण जे जे भारतीय संस्कृतीशी जोडलेले आहे ते ते म्हणजे प्रतिगामित्वाचे लक्षण अशी साम्यवाद्यांची कल्पना असते. म्हणूनच पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी २१जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून पाळण्याचा जगासमारे आग्रह धरला तेव्हा भारतातले साम्यवादी चवताळले. कारण आजवर त्यांनी योगाचा समावेश बुरसटलेल्या प्रथांत करून टाकलेला होता. असे असूनही सारे जग योगाचा स्वीकार करीत आहे हे बघून त्यांना तो आपला पराभव वाटायला लागला. साम्यवादी नेते सीताराम येचुरी यांनी तर योगासने म्हणजे कुत्र्यासारख्या हालचाली अशी योगाची संभावना केली होती. जे जे हिंदू आणि भारतीय संस्कृतीशी संबंधित आहे त्याचा त्यांनी कितीही द्वेष केला तरीही या जगाचा नियम फार वेगळा आहे.

लोक आपल्याला जे उपयुक्त आहे त्याचा स्वीकार करतात. तेव्हा जनतेने योगाचा स्वीकार केला. आता साम्यवादी पक्षांनीही नाइलाजाने का होईना पण योगाला मान्यता द्यायला सुरूवात केली आहे. केरळात डाव्या संघटनांनी योगाच्या प्रसारार्थ काही उपक्रम सुरू केले आहेत. कुन्नूर येथे माकपातर्फे योग शिबीर घेण्यात आले. तरीही त्यांची सेक्युलर खोड काही जात नाही. योगाची शिबिरे घेताना ते मंत्र म्हणण्याचे टाळतात ज्या गोष्टींना हिंदू धर्माचा वास येईल अशा गोष्टी न करता जमेल तेवढा योगाभ्यास करीत राहतात. ही पथ्ये पाळणारे आणि त्यांचा आग्रह धरणारे साम्यवादी धर्माने हिंदूच आहेत पण काय करणार, त्यांना आपल्या धर्मापेक्षा अल्पसंख्यकांच्या भावनांचे महत्त्व जास्त वाटते.

Leave a Comment