मेक इन इंडियाचे यश


भारतात मेक इन इडिया अभियानाची सुरूवात छान झाली आहे. या कार्यक्रमातून लष्करी उपकरणे तयार करण्यावर सरकारचा भर आहे आणि त्यातून सरकारला परकीय चलनात बचत करायची आहे. या योजनेतून माझगाव डॉक मध्ये पूर्ण देशी बनावटीची पाणबुडी तयार करण्यात आली असून ती नुकतीच लष्कराच्या नौदलाला समर्पित करण्यात आली आहे. भूदल आणि हवाई दलासाठी अस्त्र हे जगातले सर्वाधिक वेगाचे आणि विनाशक असे हवेतून मारा करणारे क्षेपणास्त्र विकसित करण्यात यश आल्याच्या पाठोपाठ ही पाणबुडी तयार करण्यात यश आले असून या क्षेत्रातल्या तज्ज्ञांत चैतन्याचे वातावरण आहे. या पाणबुडीकडे केवळ तांत्रिक दृष्टीने पाहण्याऐवजी मेक इन इंडियाचे यश म्हणून पाहणे हे योग्य ठरणार आहे.

अशा स्कॉर्पियन जातीच्या सहा पाणबुड्या देशात तयार करण्यात येणार असून त्यातली पहिली पाणबुडी नौदलाच्या पाणबुड्यांच्या काफिल्यात दाखलही झाली आहे. तिचे नाव कलवेरी असे आहे. मेक इन इंडिया योजनेखाली फ्रान्स बरोबर करण्यात आलेल्या तंत्रज्ञान देवाण घेवाणीच्या कराराखाली या पाणबुडीचे तंत्रज्ञान भारताला मिळाले असून त्याच्या आधारावर ही पाणबुडी तयार करण्यात आली आहे. खोल समुद्रात राहणार्‍या शार्क माशाच्या नावावर या पाणबुडीला कलवेरी असे नाव देण्यात आले आहे. भारतात १९९६ पासून पाणबुड्या बांधायला सुरूवात झाली आहे. या २२ वषार्र्ंच्या प्रवासात कलवेरी ही पहिलीच पूर्ण देशी बनावटीची पाणबुडी आहे. या पाणबुडीचे मार्‍याचे क्षेत्र १२ हजार किलो मीटर्स असून त्यावरून तिच्या सक्षमतेची कल्पना करता येते.

फ्रान्समधील डीसीएनएस या कंपनीने या पाणबुडीचे तंत्रज्ञान दिले आहे. आपल्या सरकारचे मोठे बजेट परदेशातून शस्त्रे आयात करण्यावर खर्च होते. ते वाचवण्यासाठी सरकारने ही शस्त्रे भारतातच तयार करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान मात्र आपण परदेशातून आयात करीत आहोत. प्रत्यक्षात या शस्त्रांची निर्मिती मात्र भारतात होणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही पाणबुडी तयार करण्यात आली आहे. भारतात पहिल्यांदा पाणबुडीचा वापर १९६७ साली सुरू झाला. तेव्हा आपण आयात केलेली कलवेरी या प्रकाराचीच पाणबुडी वापरत होतो. आता मात्र त्याच प्रकाराची पण पूर्णपणे भारतीय बनावटीची पाणबुडी आपण तयार केली असून नवी मजल मारली आहे.

Leave a Comment