पत्नीसाठी सत्या नडेलांनी सोडले ग्रीन कार्ड


जगप्रसिद्ध सॉफ्टवेयर कंपनी मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी स्वतःच्या प्रेमासाठी ग्रीन कार्डवर पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता. स्वतः नडेला यांनी आपल्या पुस्तकात हा गौप्यस्फोट केला आहे.

हिट रिफ्रेश या नावाने नडेला यांनी आपले आत्मचरित्र लिहिले आहे. स्वतःची नवविवाहित पत्नी अनुपमा यांना सोबत घेऊन जाण्यासाठी त्यांनी आपले ग्रीन कार्ड परत केले होते. त्यानंतर त्यांनी एच-1 व्हि्सासाठी अर्ज केला होता, असे त्यांनी म्हटले आहे.

नडेला यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या करियरच्या सुरूवातीला ते सिएटल येथे राहत होते. त्याचवेळी त्यांनी अनु यांच्याशी लग्न केले होते. अमेरिकी कायद्यानुसार एखाद्या ग्रीन कार्ड होल्डरने अमेरिकी नागरिकाशिवाय अन्य कोणाशी विवाह केला, तर त्याच्या पती किंवा पत्नीचा व्हिसा रद्द होतो. सत्या नडेला यांच्यासोबत हेच घडले.

त्यामुळे त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला होता. याबद्दल मायक्रोसॉफ्टमध्ये त्यांच्यावर खूप टीकाही झाली. ‘एच1 बी व्हिसा तुम्हाला स्वतःच्या वैवाहिक जोडीदाराला सोबत घेऊन येण्याची परवानगी देतो. मी यात काही करू शकत नव्हतो. अनु हीच माझी प्राथमिकता होती आणि त्यामुळे माझा निर्णय सोपा झाला,’ असे त्यांनी लिहिले आहे.

यानंतर नडेला परत दिल्लीला अमेरिकी दूतावासात गेले आणि तेथे ग्रीन कार्ड परत करून त्यांनी एच1 बी व्हिसासाठी अर्ज केला. तेव्हा ते पत्नीला सिएटलला घेऊन जाऊ शकले.

Leave a Comment