तृणमूलला धक्का


पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना हटवण्यासाठी देशात त्यांचे विरोधक एकत्र येण्याची तयारी करीत आहेत. प्रचाराच्या पातळीवर आणि काही माध्यमांच्या मार्फत तशा मोहिमा चालवल्या जात आहेत. आता मोदी यांचा प्रभाव ओसरत चालला असल्याचे चित्र तयार करण्याचा आणि तसा आरडा ओरडा करण्याचा प्रयास जारी आहे पण प्रत्यक्षात या विरोधकांना धक्के बसत आहेत आणि त्यांची प्रत्यक्षातली ताकद खच्ची होत आहे. आधी या मोदी विरोधी आघाडीचे नेते होते नितीशकुमार आणि ते मोदींना मोठा पर्याय देतील अशी आशा वाटत होती पण भरवशाच्या म्हशीला टोणगा व्हावा तसे नितीशकुमार हे भाजपाच्याच आघाडीत सामील झाले आणि आपले मुख्यमंत्रीपद वाचवण्यात यशस्वी झाले.

आता या आघाडीला ममता बॅनर्जी यांचा मोठा आधार वाटायला लागला होता. पण त्यांनाही मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या तृणमूल कॉंग्रेसचे उपाध्यक्ष आणि पक्षाच्या निवडणूक प्रचार मोहिमेचे व्यवस्थापक असणारे मुकूल रॉय यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. मुकूल रॉय यांना पक्षात मोठा मान होता. ते तृणमूलचे राज्यसभा सदस्य होते. त्यांनी प. बंगाल विधानसभेच्या आधी उपाध्यक्षपद स्वीकारले होते आणि ते मिळताच निवडणुकीत तृणमूलला २५० जागा मिळवून देईन अशी घोषणा केली होती. त्यांनी ती खरी करून दाखवली आणि २११ जागा पटकावल्या. आता हे मुकूल रॉय पक्षातून बाहेर पडले आहेत पण ते पुढे काय करणार असा प्रश्‍न आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला तर ती गोष्ट भाजपाला वरदान ठरण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुकूल रॉय आणि ममता बॅनर्जी यांच्या विचारात फरक पडत चालला होता. सारदा चिट फंड घोटाळ्यात या दोघांवरही आरोप होते. रॉय यांना तर सीबीआय ने चौकशीच्या चक्रात फिरवून जर्जर केले होते. पाच महिने ही चौकशी झाल्यानंतर त्यांनी आपण सीबीआयला सहकार्य करण्यास तयार आहोत आणि आपला सीबीआयवर विश्‍वास आहे असे म्हटले. पण ममता बॅनर्जी या मात्र थयथयाट करीत राहिल्या. मोदी सीबीआयचा वापर आपल्या विरोधकांना नामोहरम करण्यासाठी करीत आहेत असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. मुकूल रॉय यांनी मात्र ही भाषा वापरली नाही. हा फरक का पडला असा प्रश्‍न विचारला जात आहे. मुकूल रॉय यांना सीबीआयकडून फार त्रास होणार नाही असे आश्‍वासन मिळाले आहे की काय अशी चर्चा सुरू आहे.