
पराठा हा असा पदार्थ आहे जो जेवण म्हणून किंवा मधल्या वेळचे खाणे असे विविध वेळचा खाद्यपदार्थ म्हणून उपयोगी ठरतो. दिवसभराच्या कोणत्याही वेळी गरमागरम पराठा नक्कीच उत्तम पर्याय आहे. पराठा तयार करण्याची पद्धत अगदी साधी आणि सोपी, समान असली तरीही दोन वेगळ्या पराठ्यांची चव निराळीच लागते. पराठे हा आपल्या आहारातील अविभाज्य पदार्थ झालाय. भाजी भरून
केलेला असो किंवा भाज्यांमध्ये पीठ मिसळून केलेला असो पराठा प्रत्येक वयोगटाचा आवडीचा पदार्थ आहे.
स्वादिष्ट पराठे
मटार पराठा – मटाराच्या मोसमात जिथे तिथे हिरवेगार मटाराचे ढीग आपल्याला आकर्षून घेत असतात. त्याचे भाजीसह विविध पदार्थ केले जातात. त्यात भर पडते ती मटार पराठ्याची. त्यासाठी मटार दाणे मीठाच्या पाण्यात शिजवून घ्यावेत. शिजलेले मटार पाण्यातून काढून मिक्सरमध्ये जाडेभरडे फिरवून
घ्यावेत. मग मीठ असलेला हा गोळा कणकेत भरून मटारचा साधा पराठा बनवू शकता. अधिक चवीसाठी थोडीशी लाल मिरचीची पावडर मटारच्या स्टफिंगमध्ये घालूनही पराठा करू शकता.
केरळी पराठा – दाक्षिणात्य पद्धतीचा हा पराठा लच्छा पराठ्यासारखा असतो असे आपण म्हणू शकतो. याला मलाबार पराठा देखील म्हटले जाते. एका भांड्यात पीठ, बेकिंग पावडर, मीठ, साखर आणि दूध एकत्र मिसळून त्याची कणीक मळून घ्यावी. त्याचे लहान लहान गोळे करून ते कापडाखाली झाकून बाजूला ठेवावे. मग या गोळ्यांचे पराठे लाटून घ्यावेत. त्यावर आवडीनुसार तेल किंवा तूप लावून त्यावर पीठ भुरभुरावे मग सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते गुंडाऴावे किंवा घड्या घालून मग स्वीस रोल सारखा आकार द्यावा. आता हा रोल उभा दाबून पुन्हा पराठा लाटावा. मग तूप किंवा तेल लावून तो खरपूस भाजून घ्यावा.
सुक्या-मेव्याचा पराठा – पराठा अधिक पोषक करायचा असेल तर हा पर्याय नक्कीच वापरता येईल. त्यासाठी काही विशिष्ट सुकामेवा वापरायचा आहे.
काजूगर, बदाम बी आणि पिस्ता हे एकत्र मिक्सरमधून बारीक करून त्याची पूड करा. ही पावडर भांड्यात काढून त्यात चिरलेली कोथिंबीर, लाल मिरची पावडर आणि मीठ घाला. हे सर्व एकत्र करून चांगले मिसळून घ्या. हे मिश्रण कणकेच्या पारीत भरून त्याचा पराठा करा. जर खाताना थोडा कुरकुरीतपणा हवा असेल तर त्यात दाण्याचे बारीक तुकडे घालावेत.
सातूचा पराठा – सातूचे पीठ हे अतिशय पौष्टिक असते. एका बाऊल मध्ये सातूचे पीठ, मीठ आणि तिळाचे तेल सर्व एकत्र मिसळा. गरज लागेल तसे पाणी घाला. ओवा, लिंबाचा रस, कापलेल्या मिरच्या आणि आलंलसूण पेस्ट हे मिश्रण करून घ्या. सातूच्या कणकेत हे मिश्रण भरून त्याचे पराठे लाटा आणि भाजून घ्या.
बेबी कॉर्न मसाला पराठा – बेबी कॉर्न पौष्टीक असतेच पण बहुतेकदा बेबी कॉर्न पिझ्झा, पास्ता यात वापरले जाते किंवा मग थेट भाजी करून खाल्ले
जाते. पण बेबी कॉर्नचा पराठा करूनही खाता येतो. कढई घेऊन त्यात तेल गरम करावे मग मोहरी घालून त्यात कापलेला कांदा आणि आलं लसूण यांची पेस्ट घाला. कांदा थोडा गुलाबी झाला की उकडलेला मटार, बटाट्याच्या फोडी घाला त्यानंतर बारीक चिरलेले बेबी कॉर्न घाला. चवीपुरचे मीठ, तिखट झाला. या सर्व भाज्या छान शिजू द्या. मग त्यात गरम मसाला पावडर घाला. हे सर्व शिजवल्यावर ते बारीक करून घ्या. आणि कणकेत भरून पराठे लाटा.
मशरुम पराठा – मशरुम अतिशय पौष्टीक असतात. तसेच कोणताही मसाला घालून ते चांगले लागतात. कढईत तेल गरम करायला ठेवा त्यात मोहरी घालूा हिंग घाला आणि कढी पत्ता घाला. त्यानंतर चिरलेले मश्रुम, गाजर आणि बटाट्याचा लगदा घाला. काही मिनिटे चांगले परतून घ्या. त्यानंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला, गरम मसाला घाला, आमचूर पावडर घाला तसेच मीठ घाला. गॅस कमी करून या मिश्रणावर पाण्याचा हबका मारा. हे शिजेपर्यंत कणीक मळून घ्या. भाजी शिजल्यावर कणकेत हे मिश्रण भरून पराठे करावेत.
