मुलीला आयफोन-८ भेट देण्यासाठी पित्याची सिंगापूरवारी


आपल्या मुलीच्या लग्नात तिला भेट म्हणून आयफोन-८ भेट देण्यासाठी एका भारतीय व्यापाऱ्याने चक्क सिंगापूरची वारी केली आहे.

अमीन अहमद ढोलिया असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. गुरुवारी सकाळी सात वाजता ते सिंगापूरला पोचले आणि ऑर्चर्ड रोडवर असलेल्या अॅप्पलच्या दुकानाबाहेर रांगेत लागले. त्यावेळी रांगेत ते सर्वात पुढे उभे होते. याच रांगेत त्यांनी रात्रभर तब्बल १३ तास काढले.

आयफोन-८ प्लस हा फोन अॅप्पलने काल सादर केला. तो विकत घेण्यासाठी ढोलिया हे सिंगापूरला गेले, असे स्ट्रेट्स टाईम्स या वर्तमानपत्राने म्हटले आहे.
‘मी दोन फोन विकत घेणार आहे. एक फोन माझ्या दुसऱ्या मुलीसाठी घेणार आहे. मी पहिल्यांदा एखाद्या गोष्टीसाठी रात्रभर रांगेत उभा राहिलो आहे. मला आता छान वाटत आहे,’ असे त्यांनी स्ट्रेट्स टाईम्सला सांगितले. सकाळी आठ वाजता हे दुकान उघडले त्यावेळी रांगेत सुमारे २०० जण होते व त्यातील बहुतांश परदेशी होते.

अॅप्पलने १२ सप्टेंबर रोजी आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लस हे फोन सादर केले होते. दूरसंचार कंपन्यांशी केलेल्या करारामुळे ग्राहकांना सिंगापूरमध्ये हे फोन कमी किमतीत मिळू शकतात.

Leave a Comment