मोदींच्या टॉप टेन ब्रेन मधले महाराष्ट्राचे डॉ.श्रीकर परदेशी


मोदी सरकारने गतीमान व झटपट निर्णय घेणारे सरकार अशी प्रतिमा लोकमानसात निर्माण केली असताना त्यांच्या या योजनेला सनदी नोकरशहांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. देशाच्या विविध राज्यातून त्यासाठी पंतप्रधान मोदींनी जी १० रत्ने म्हणजे सनदी अधिकारी आपल्या टीममध्ये सामील करून घेतले आहेत त्यात महाराष्ट्राचे डॉ.श्रीकर परदेशी यांचा समावेश आहे. या टीममधले महाराष्ट्राचे ते एकमेव प्रतिनिधी आहेत याचा महाराष्ट्राला मोठा अभिमान आहे.

मूळचे सांगलीचे असलेले श्रीकर परदेशी यांचे बरेचसे शिक्षण पुण्यात झाले आहे. पुण्याच्या बीजे मेडिकलमधून एमबीबीएस व नंतर एमडी पदवी मिळविल्यानंतर त्यांनी प्रथम प्रयत्नात आयएएस होण्यात यश मिळविले होते. अतिशय प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अशी त्यांची जनमानसातील प्रतिमा आहे. खासगी आयुष्य साधेपणाने जगण्यावर भर देणारे परदेशी यांनी कोणत्याही वैयक्तीक कामासाठी सरकारी यंत्रणेचा अथवा सोयी सुविधांचा गैरवापर केलेला नाही.

नांदेड येथे जिल्हाधिकारी असताना बोगस शाळा व शिक्षक प्रकरण तसेच सामुहिक कॉपी प्रकरणाची तड त्यांनी लावली होती त्याचबरोबर राजकीय नेत्यांचा दबाव असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून काम करताना अवैध बांधकामे कुणाचाही दबाव न जुमानता तोडण्याचे कामही त्यांनी प्रभावीपणे केले होते. त्यामुळे त्यांना बुलडोझर व डिमॉलशियन मॅन अशी उपाधीही दिली गेली होती. मात्र याची शिक्षा म्हणून त्यांची आयुक्तपदावरून उचलबांगडी केली गेली होती.

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही परदेशी यांची बदली केली नसती तर माझे सरकार कोसळले असते अशी प्रतिक्रिया त्यावेळी दिली होती. परदेशी यांच्याकडे सारथी संगणक प्रणाली सुरू करण्याचे श्रेयही जाते. भ्रष्ट सरकारी अधिकारी व गैरकृत्ये करणरे ठेकेदार यांच्यात परदेशी यांची चांगलीच जरब होती.त्याचप्रमाणे सारथी संगणक प्रणालीच्या माध्यामातून त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना पालिका कामकाजाची माहिती मिळण्याची सोय केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून त्यांना दुवा दिला जात होता.

Leave a Comment