ऑक्टोबरपर्यंत पहा जिओच्या मोफत फोनची वाट !


नवी दिल्ली : २१ सप्टेंबरपासून रिलायन्स जिओच्या मोफत फोनची डिलिव्हरी होणार असे सांगण्यात आले होते. पण आता ही तारीख बदलून ऑक्टोबरमध्ये फोन मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कंपनीला हा निर्णय जिओ मोबाईलच्या वाढत्या मागणीमुळे घ्यावा लागला.

जिओच्या मोफत फोनची बुकींग २४ ऑगस्टपासून चालू झाली. पण कंपनीला अधिक प्रमाणात झालेल्या प्री बुकींगमुळे दोन दिवसातच प्री बुकींगची सुविधा बंद करावी लागली. पहिल्याच वेळेस ६० लाखांहून अधिक लोकांनी जिओ फोनसाठी बुकींग केले. प्रथम रिलायन्स जिओच्या ४जी फोनची डिलिव्हरी तारीख सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ठरवण्यात आली होती. त्यानंतर ती वाढवून २१ सप्टेंबर करण्यात आली. मीडिया रिपोर्टनुसार, आता ही तारीख कंपनीने अजून पुढे ढकलली आहे. आता १ ऑक्टोबर २०१७ ला जिओ फोन उपलब्ध होईल, असे सांगण्यात येत आहे. जिओ युजर्ससाठी जिओ ४जी फोन मोफत देण्याचे सांगण्यात आल्यामुळे या फोनच्या बुकींगसाठी लोकांची झुंबड उडाली आहे.

जिओ फोनचे प्री बुकींग तुम्ही देखील केले असेल तर अधिक माहितीसाठी १८००८९०८९०० या नंबर वर फोन करू शकता. परंतु, या नंबरवर फोन करण्यासाठी तुम्हाला प्री बुकींगच्या वेळेस दिलेल्या जिओ नंबरवरूनच फोन करावा लागेल. त्याशिवाय myJio अॅप द्वारे देखील तुम्ही त्यासंदर्भातील माहिती मिळवू शकता. त्यासाठी जिओ अॅप ओपन करून माय वाऊचर सेक्शन ओपन करा. तेथे तुम्हाला तुमचा फोन ट्रॅक करण्याचा ऑप्शन मिळेल. तिथून तुम्हाला ४जी फोनच्या डिलिव्हरी संदर्भात अधिक माहिती मिळेल.

Leave a Comment