ट्रेंडमध्ये आला #अच्छे_दिन_का_महँगा_पेट्रोल हॅशटॅग


नवी दिल्ली – सध्याच्या घडीला दररोज पेट्रोल, डिझेलचे दर बदलत असल्यामुळे पेट्रोलच्या दरात देशातील अनेक शहरात मोठी वाढ झालेली दिसून येते. देशात पेट्रोलची कुठे ८० तर कुठे ७९ रुपये प्रतिलिटर दराने विक्री होते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेत आल्यावर पेट्रोल डिझेलचे दर कमी करू, असे आश्वासन दिले होते. पण सध्याची परिस्थिती पाहता मोदींचे आश्वासन हवेतच विरून गेल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पेट्रोल डिझेलच्या भाववाढीवरून तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे. #अच्छे_दिन_का_महँगा_पेट्रोल हा हॅशटॅग सकाळपासूनच ट्विटरवर ट्रेंड होत आहे. लोकांनी ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

महाग पेट्रोल मिळणारा भारत हा आशियातील पहिल्या क्रमांकाचा देश आहे तर आशिया खंडात इतरही देश आहेत पण त्यांच्या तुलनेत भारतात कैक पटींनी पेट्रोल, डिझेलचे भाव चढे आहेत. पण आशिया खंडातील इतर देशांत पेट्रोल, डिझेलचे दर भारतापेक्षा ३० ते ४० टक्क्यांनी कमी आहेत. आशिया खंडातील इतर देशांमध्ये सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पेट्रोल, डिझेलचे दर हे भारतीय दराच्या तुलनेत २० ते ३० रुपयांनी कमी होते. पाकिस्तानमध्ये पेट्रोलचा दर हा ४२ रुपये प्रतिलिटर, श्रीलंकेत ५३ रुपये प्रतिलिटर, नेपाळ, भुतानमध्ये अनुक्रमे ६१ आणि ६२ रुपये प्रतिलिटर एवढा होता. तर मलेशिया, इंडोनेशियामध्ये तर पेट्रोलच्या किंमती भारताच्या तुलनेत सर्वाधिक कमी आहेत. मलेशियामध्ये सध्याच्या घडीला ३२ रुपये प्रतिलिटरच्या आसपास तर इंडोनेशियामध्ये ४० रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोल मिळते.

ही तफावत डिझेलच्या किंमतीबाबतही प्रकर्षाने जाणवते. ४६ रुपये प्रतिलिटर पाकिस्तान, नेपाळमध्ये डिझेलच्या किंमती आहेत. तर गेल्या आठवड्यापर्यंत श्रीलंका, इंडोनेशिया आणि मलेशियामध्ये डिझेलचा दर हा ३१ ते ४३ रुपयांच्या आसपास होता. त्यामुळे सोशल मीडियावर हा दर पाहून मोदी सरकार विरोधात तीव्र नाराजी पाहायला मिळते आहे.

Leave a Comment