भारतातील अध्यात्मिक गुरुंकडे आहे किती संपत्ती ?


मुंबई: आध्यात्मिक गुरु आणि त्यांच्या आश्रमांचे आपल्या देशात मोठे प्रस्थ आहे. पण आपल्या आश्रमांच्या माध्यमातून या अध्यात्मिक गुरुंनी कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचा डोलारा उभारला आहे. त्यातील काही निवडक ५ अध्यात्मिक गुरुंकडे किती संपत्ती आहे याचा इंटरनेट, गुगल, अध्यात्मिक गुरुंच्या वेबसाईट, विकिपिडीया यांच्या माध्यमातून घेतलेला आढावा.

माता अमृतानंदमयी : हिंदू आध्यात्मिक शिक्षक आणि नेत्या म्हणून माता अमृतानंदमयी यांची ओळख आहे. त्यांना असंख्य अनुयायांनी संत पद बहाल केले आहे. माता अमृतानंदमयी अलिंगन देणारी संत म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांचे जवळपास ३ कोटी अनुयायी आहेत. ‘अमृतानंदमयी’ हे ट्रस्ट माता अमृतानंदमयी यांच्यामार्फत चालवले जाते. अंदाजे १५०० कोटींची संपत्ती या ट्रस्टकडे आहे. अनेक शाळा, महाविद्यालये आणि टीव्ही चॅनेल्स माता अमृतानंदमयी यांच्या नावे असून त्यांच्या उत्पन्नाचे हेच प्रमुख स्त्रोत आहे.

रामदेव बाबा : योगगुरु म्हणून रामदेव बाबा हे सर्वपरिचीत असून योगा, आयुर्वेदिक औषधे, शेती उत्पादने आणि स्वदेशीचा प्रचार-प्रसार रामदेव बाबा हे करतात. गरीब कुटुंबात जन्माला आलेले रामदेव बाबा यांचे वडील हरियाणात शेतकरी होते. १५ वर्ष खडतर आयुष्य जगून रामदेव बाबा यांनी हरिद्वारमधील लोकांना योगा शिकवण्यास सुरुवात केली. योग आणि योगासनाचे त्यांना चांगले ज्ञान आहे. आज हेच ज्ञान त्यांची ओळख बनली आहे. याच योगाच्या माध्यमातून त्यांनी पतंजलीची स्थापना केली. पतंजली योगपीठ आणि दिव्य योगी मंदीर ट्रस्ट या माध्यमातून रामदेव बाबा यांच्याकडे ११०० कोटींची संपत्ती आहे.

श्री श्री रवीशंकर : श्री श्री रवीशंकर म्हणजे भारतातील प्रमुख आध्यात्मिक गुरुंपैकी एक नाव होय. त्यांची ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रेणेते म्हणून ओळख आहे. त्यांचे जगभरात अनुयायी आहेत. जगातील सुमारे १५१ देशात ३० कोटींपेक्षा जास्त श्री श्री यांचे अनुयायी आहेत. १ हजार कोटी रुपयांपर्यंतची त्यांची वार्षिक उलाढाल आहे. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ हाच त्यांचा महत्त्वाचा उत्पन्नाचा स्त्रोत असल्याचे सांगण्यात येते. तामिळनाडूत जन्मलेल्या रवीशंकर यांनी वैदिक शिक्षणाला सुरुवात केली. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी वैदिक साहित्य आणि विज्ञान या विषयाचे शिक्षण पूर्ण केले.

आसाराम बापू : आश्रमातील अवैध कारनाम्यांमुळे भारतीय आध्यात्मिक क्षेत्रातील आसाराम बापू हे स्वयंघोषित संत असून सध्या आसाराम बापू जेलची हवा खात आहेत. ३५० कोटींच्या घरात आसाराम बापू ट्रस्टची वार्षिक उलाढाल आहे. देशा-विदेशात ३५० आश्रम आणि १७ हजार बालसंस्कार केंद्र आसाराम बापू ट्रस्टची आहेत.

राम रहीम सिंह : सध्या देशासह जगभरात डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह चर्चेत आहे. गुरमीत राम रहीम यांचे सातत्याने चर्चेत आणि वादात राहणे हे प्रमुख वैशिष्ट्य आहे. १९४८मध्ये डेरा सच्चा सौदाची स्थापना बलुचिस्तानातील शाह मस्ताना यांनी केली. हरियाणातील सिरसा येथे आध्यात्मिक केंद्र म्हणून डेरा सच्चा सौदाचा आश्रम आहे. सिरसा येथे सुमारे ७०० एकर शेतजमीन या आश्रमाची आहे. याशिवाय दवाखाने, जमिनी, इमारती अशी अनेक प्रॉपर्टी गुरमीत राम रहीमकडे आहे. तत्कालीन डेरा प्रमुख सतनाम सिंह यांनी २३ सप्टेंबर १९९०मध्ये राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये जाट शिख कुटुंबात जन्मलेल्या बाबा राम रहीमला आपला वारसदार घोषित केले. बाबा राम रहीम वयाच्या २३व्या वर्षी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बनला. बाबा राम रहीम यांच्या नेतृत्त्वात यानंतर डेरा सच्चा सौदाची लोकप्रियता वाढू लागली. सामाजिक एकोपा, नशामुक्ती आणि मानवसेवेपासून सर्वधर्मसमभावचा संदेश बाबा राम रहीमचा डेरा सच्चा सौदा देतो.

Leave a Comment