तुम्हाला हवा आहे का सर्वात आधी जिओचा मोफत फोन? मग हे करा


मुंबई : सर्वात स्वस्त फीचर फोन देण्याची घोषणा रिलायन्स जिओने केल्यानंतर ग्राहकांना या फोन बाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. कंपनीने हा फोन १५ ऑगस्ट रोजी बीटा टेस्टिंगसाठी लाँच केला. हा फोन ग्राहकांच्या हातात येण्यासाठी सप्टेंबर महिन्याची वाट पहावी लागणार आहे.

१५३ रुपयात एका महिन्यासाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि अनलिमिटेड डेटा मिळणार असल्याने या फोनवर ग्राहकांची उडी पडणार आहे. हा फोन मिळविण्यासाठी तीन वर्षांसाठी १५०० रुपये अमानत म्हणून ठेवावे लागणार आहे, जे ग्राहकाला तीन वर्षांनी परत मिळणार आहेत.

या फोनसाठी जो आधी बुकिंग करेल; त्यालाच हा फोन सर्वप्रथम मिळणार असल्यामुळे आतापासूनच फोन बुक करण्यासाठी ग्राहकांचे प्रयत्न सुरु झाले आहेत. सध्या या फोनची दिल्ली एनसीआरमध्ये प्री बुकिंगही सुरु असल्याची माहिती असल्यामुळे ग्राहकांनी फोनच्या बुकिंगसाठी राजधानी दिल्लीतील दुकानांमध्ये गर्दी केली आहे.

तुम्हाला जर या फोनच्या बुकिंगसाठी दुकानांच्या रांगते उभे रहायचे नसेल तर तुम्ही घरबसल्याही जिओ फोन बुक करु शकता. त्यासाठी तुम्हाला केवळ एक मेसेज करावा लागेल. जिओ फोन बुक करण्यासाठी मेसेज बॉक्समध्ये जाऊन ‘JP> तुमचा पिनकोड> जवळच्या जिओ स्टोअरचा कोड’ 7021170211 या क्रमांकावर पाठवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला कंपनीकडून Thank You असा रिप्लाय येईल. याबाबत इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार ग्राहकाचा हा मेसेज कंपनीला मिळताच फोनविषयी संपूर्ण माहिती कॉल करुन ग्राहकाला दिली जाईल.

जिओ फोनची अधिकृत बुकिंग २४ ऑगस्ट रोजी सुरु होणार आहे. तेव्हापासूनच ग्राहकांना फोन करुन त्यांच्या फोनविषयी माहिती दिली जाईल. ज्या ग्राहकाला जिओ फोन खरेदी करायचा आहे, त्याला कंपनीकडून अशा जिओ स्टोअरचा कोड दिला जाईल, जिथे जिओ फोन उपलब्ध असेल. जिओ फोन बुक करण्यासाठी ग्राहकाकडे आधार कार्ड असणे बंधनकारक आहे. आधार कार्डची फोटो कॉपी जवळच्या अधिकृत जिओ फोन विक्रेत्याला द्यावी लागेल. एका आधार कार्डवर केवळ एकच फोन खरेदी करता येईल.

Leave a Comment