जिओ फोनसाठी लागणार ‘ही’ कागदपत्र


नवी दिल्ली : २४ ऑगस्टपासून जिओच्या मोफत फोनची अधिकृत बुकिंग सुरु होणार असून पण दिल्ली एनसीआरमध्ये काही ऑफलाईन स्टोअर्समध्ये आत्तापासूनच प्री-बुकिंग सुरु झाल्याचे वृत्त ‘गॅजेट ३६०’ ने दिले आहे. जिओचा हा फोन १५ ऑगस्ट रोजी लाँच होणार आहे.

तुम्हाला जिओ फोनची बुकिंग करताना अधिकृत जिओ फोन विक्रेत्याकडे आधार कार्डची एक झेरॉक्स द्यावी लागेल. एक व्यक्ती एका आधार कार्डवर देशात एकच फोन खरेदी करु शकतो. त्यामुळे तुम्हाला अनेक फोन बुक करण्याची इच्छा असेल तर तसे करता येणार नाही. आधार कार्ड दिल्यानंतर नोंदणी होईल, त्यानंतर टोकण नंबर देण्यात येईल. हा टोकण नंबर फोन घेताना उपयोगी येईल.

जिओ फोन हा शून्य रुपये किंमतीमध्ये असेल, मात्र अनामत रक्कम म्हणून १५०० रुपये द्यावे लागतील, अशी घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी केली होती. पण ऑफलाईन फोन खरेदी करताना तुम्हाला आधार नंबर व्यतिरिक्त कशाचीही गरज नाही. हे १५०० रुपये तुम्हाला फोन हातात पडेल तेव्हा द्यावे लागतील.

आत्ता जिओ फोनची बुकिंग केल्यास डिलीव्हरी १ ते ४ सप्टेंबर या काळात मिळण्याची शक्यता आहे. पुढे बुकिंगची संख्या वाढल्यास फोन उशीराही मिळू शकतो. आधी बुक करणाऱ्या ग्राहकालाच अगोदर फोन मिळणार आहे. जिओ फोन २४ ऑगस्टपासून माय जिओ अॅप, जिओची वेबसाईट किंवा रिलायन्स स्टोअर्समध्ये जाऊन बुक करु शकता.

Leave a Comment