अँबी व्हॅलीचा लिलाव होणारच – सर्वोच्च न्यायालय


नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सहारा समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना मोठा दणका दिला असून सर्वोच्च न्यायालयाने पुण्यातील लोणावळ्याजवळ उभारलेल्या ‘अॅम्बी व्हॅली सिटी’च्या लिलावास स्थगिती देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिल्यामुळे अॅम्बी व्हॅली सिटीचा लिलाव होणार हे मात्र निश्चित झाले आहे.

सेबीने सहारा समुहाचे दोन प्रकल्प अवैध ठरवल्यामुळे या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना २० हजार कोटी रुपये परत करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्यानुसार ही रक्कम उभारण्यासाठी अॅम्बी व्हॅलीच्या जागतिक लिलावाची प्रक्रिया मुंबई उच्च न्यायालयाच्या लिक्विडेटरकडून सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया थांबवण्यासाठी सुब्रतो रॉय यांनी विनंती केली होती, मात्र ती फेटाळण्यात आली आहे.

मुद्दल रक्कमेतील म्हणजेच मूळ २० हजार कोटींमधील एका मोठ्या रकमेचा भरणा सहारा समुहाने केलेला नाही. २० हजार कोटीपैकी ९ हजार कोटी येणे बाकी असल्याचेही सेबीने म्हटले आहे. सहारा समुहाने २५ जुलै रोजी झालेल्या सुनावणीत रक्कम जमा करण्यासाठी १८ महिन्यांची मुदत मागितली होती. पण न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने सहारा समुहाला एवढी मुदत देण्यास नकार दिला आहे.

Leave a Comment