शेपटीतला दणका


मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा काल निरोप समारंभ झाला. त्यापूर्वी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनाही निवृत्तीनिमित्त निरोप देण्यात आला. या दोघांच्याही निरोप समारंभातील उपस्थित सत्ताधारी नेते आणि अन्य पक्षीय नेते यांनी राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती या दोन्ही पदांच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल असे वक्तव्य केले नाही. उपस्थित सदस्यांनी ते पथ्य पाळले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही तशी काळजी घेतली. राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती हे कोणत्याही पक्षाचे नसतात. नवे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद या दोघांनीही आपली उमेदवारी जाहीर होताच हीच गोष्ट आवर्जुन सांगितली. श्री. प्रणव मुखर्जी यांनीही आपल्या पदाची प्रतिष्ठा आणि उंची यांचा आब राखून आपल्या निरोप समारंभात किंवा पदावर असतानाच्या कार्यक्रमात आपला पक्षीय रंग कधी दाखवला नाही. त्यामुळे त्यांच्या विषयी भारतीय जनतेच्या मनात आदरच निर्माण झाला. मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांना मात्र अशी प्रतिष्ठा राखता आली नाही आणि त्यांनी जाता जाता आपला पक्षीय रंग दाखवून उपराष्ट्रपती पदाच्या प्रतिष्ठेला कलंक फासला.

उपराष्ट्रपती हे मुस्लीम समाजातून आहेत म्हणजे ते अल्पसंख्य समाजातले आहेत. परंतु भारतीय लोकशाहीने त्यांना एक अपूर्व असा मान दिला. जो यापूर्वी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन या हिमालयाएवढ्या उंचीच्या तत्वज्ञालाच दिला गेला होता. राधाकृष्णन हे १९५२ साली उपराष्ट्रपती झाले आणि नंतर १९५७ सालीही त्यांनाच पुन्हा उपराष्ट्रपती करण्यात आले. ही संधी त्यानंतर केवळ डॉ. अन्सारी यांनाच मिळाली. ज्या भारतीय लोकशाहीमध्ये आपल्याला एवढा सन्मान मिळाला त्या लोकशाहीबद्दल चार कृतज्ञतेचे शब्द उच्चारण्याऐवजी डॉ. अन्सारी यांनी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला टोमणा मारण्यातच धन्यता मानली. डॉ. अन्सारी हे राजनीतीज्ञ म्हणून प्रसिध्द आहेत. परंतुु आपल्या जन्मभरात त्यांनी कधी मनाचा एवढा संकुचितपणा दाखवून पक्षीय राजकारणाच्या चिखलात आपला हात बरबटवून घेतला नव्हता. नेमका निरोप समारंभातच त्यांना ही आवदसा का आठवली? त्यांच्या या प्रवृत्तीबद्दल खेद व्यक्त करावासा वाटतो. जाता जाता त्यांनी भारतातले मुस्लीम असुरक्षित आहेत याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांना खरोखरच चिंताच होती तर त्यांनी काश्मीरमधील हिंदूच्या अवस्थेबद्दल एखादा शब्द तरी उच्चारायला हवा होता. परंतु त्यांचे मुस्लीम प्रेम त्यांना गप्प बसू देत नव्हते म्हणून त्यांनी भारतात मुस्लीम असुरक्षित आहेत अशी बांग ठोकली.

भारतात मुस्लीम खरोखर असुरक्षित असते तर डॉ. अन्सारी यांनी तसे म्हणायला हरकत नव्हती. परंतु वस्तुस्थिती काय आहे? भारतातल्या मुस्लिमांसाठी कुराणावर आधारलेला नागरी कायदा जारी आहे. याबाबतीत त्यांना वेगळे स्थान देण्यात आलेले आहे. जगातल्या अनेक मुस्लीम देशांमध्येसुध्दा कुरणावर आधारलेले कायदे रद्द करून आधुनिक काळातले कायदे लागू करण्यात आलेले आहेत. परंतु हिंदू बहुल भारतात मात्र मुस्लिमांचा नागरी कायदा वेगळा ठेवण्याचे लाड ठेवले गेलेले आहेत. मुस्लीम असुरक्षित असते तर देशातल्या हिंदूंनी किंवा सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने त्यांच्याशी दुजाभाव करायचे ठरवले असते तर त्यांचा नागरी कायदा मागेच संपवला गेला असता. भारतात सेक्युलर सरकार आहे आणि या सेक्युलॅरिझमचे प्रवर्तक देशातल्या शाळांमध्ये आणि शिक्षणसंस्थांमध्ये हिंदू धर्माशी संबंधित असे काही शिक्षण दिले जाऊ नये याबाबत जागरूक आहेत. जगातल्या अनेक ख्रिश्‍चन बहूल देशामध्ये जी भगवद्गीता मानवतेचा ग्रंथ म्हणून शिकवली जाते ती भगवद्गीता भारतात मात्र वर्ज्य आहे. हिंदू धर्माशी संबंधित असे काहीही शाळांमध्ये व्हायला लागले की या देशातले हिंदूच आरडाओरडा करायला लागतात.

अशा वातावरणात मुस्लीम धर्माचे शिक्षण देणार्‍या मदरशांना सरकारचे अनुदान मिळते. या देशातले मुस्लीम असहाय्य आणि बापुडवाणे असल्याचा हा पुरावा आहे का? भारतातला मुस्लीम मनुष्य परदेशात जाऊन येतो तेव्हा तिथे मुस्लिमांची अवस्था बघून त्याच्या हे लक्षात येते की भारतातले मुस्लीम जगातल्या कोणत्याही देशातल्या मुस्लिमांपेक्षा सुरक्षित आणि स्वतंत्र आहेत. प्रश्‍न केवळ गोमांसाचा उपस्थित झालेला आहे. ज्या लोकांचे मांस खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही त्यांनी अन्य कोणत्याही प्राण्यांचे मांस खावे पण हिंदूंच्या भावनांचा आदर राखण्यासाठी फक्त गाईचे मांस टाळावे अशी भारतातल्या हिंदू समाजाची इच्छा आहे. तिला केवळ धार्मिक आणि भावनिकच महत्त्व आहे असे नाही तर आर्थिक महत्त्वसुध्दा आहे. तेवढी एक गोष्ट सोडली तर देशातला हिंदू समाज मुस्लिमांना कोणत्याही मुद्यावरून कसलाही त्रास देत नाही. याची ग्वाही देशातले मुस्लीमच देतील. देशाविषयी प्रेम व्यक्त करणारे वंदे मातरम् हे गीत अधिकृत राष्ट्रगीत नाही ही गोष्ट खरी. परंतु देशप्रेम प्रकट करणारी वंदे मातरम्ची घोषणा आम्ही देणार नाही असे म्हणण्याचा अधिकार या देशातल्या मुस्लिमांना आहे. एवढे स्वातंत्र्य असतानासुध्दा डॉ. हमीद अन्सारी इस्लाम खतरे मे है अशी बांग देत असतील तर त्यात ढोंगीपणाशिवाय दुसरे काहीही नाही. हा ढोंगीपणा करणारे अनेक लोक भारतात आहेत. पण त्यात देशाच्या मावळत्या उपराष्ट्रपतींनी सहभागी व्हावे ही गोष्ट मनाला खटकणारी आहे.

Leave a Comment