साराहाह अॅपवर पडत आहेत अनेकांच्या उड्या


मुंबई : सध्या फेसबुकच्या न्यूज फीडमध्ये वारंवार साराहाह या अॅपच्या लिंक्स दिसत असून तुम्ही यावरुन एखाद्या व्यक्तीला तुमच्या मनातील गोष्ट सांगू शकता, पण यामध्ये तुमची ओळख गोपनीय राहील. एखाद्याविषयी तुमच्या मनात असलेले प्रेम किंवा तिरस्कार तुम्ही त्याच्यापर्यंत या अॅपच्या माध्यमातून पोहचवू शकाल. सध्या या अॅपवर अनेकांच्या उड्या आयडेंटिटी गुप्त राहत असल्यामुळे पडत आहेत.

तुमच्या फेसबुक फ्रेंड्सनी तुम्हाला ‘साराहाह’ची लिंक शेअर केली असेलच. सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसात ‘साराहाह’च्या लिंक्सचा पूर आला आहे. या लिंकवर क्लिक करा आणि साईन इन करुन तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमच्या मनातला प्रश्न विचारु शकता.

‘साराहाह’वर अकाऊण्ट ओपन करण्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल स्टोअरवरुन ‘साराहाह’ हे अॅप डाऊनलोड करु शकता. आयओएससाठी ‘साराहाह’ची २२ एमबीची, तर अँड्रॉईडसाठी १२ एमबीची फाईल आहे. अॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला साईन इन करावे लागेल. तुमच्या अकाऊंटची मेसेज लिंक फेसबुक अकाऊंटवर शेअर करा. यानंतर तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. तुमचे मित्र तुम्हाला मेसेज पाठवत जातील. मात्र मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचे नाव तुम्हाला समजणार नाही, हीच या अॅपची खासियत आहे. तुम्हाला संबंधित मेसेजवर क्लिक केल्यानंतर एक मेसेज बॉक्स दिसेल. तुम्ही त्यावर तुमचे उत्तर लिहून पाठवू शकता. हे अॅप सौदी अरेबियातील जेन अबीदिन तौफिकने तयार केले असून जुलै २०१७ मध्ये हे सोशल मीडिया अॅप अपडेट करण्यात आले आहे.

या अॅपचे जसे फायदे आहेत तसे तोटे देखील आहेत. मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख गुप्त राहणार असल्यामुळे कोणतीही व्यक्ती कोणालाही कशाही प्रकारचा मेसेज पाठवू शकते. यामध्ये शिवराळ किंवा अश्लील मेसेजचाही समावेश होतो. तुम्हाला मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटणार नसल्यामुळे त्याचा गैरवापर होण्याची भीती आहे. अर्थातच अशा मेसेजविरोधात सायबर क्राईमकडे तक्रार करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

Leave a Comment