राजस्थान येथील सुंदर पर्यटनस्थळे रणकपूर आणि किराडू


‘पधारो म्हारे देस’ असे म्हणत दोन्ही हात जोडून स्वागत करणारे राजस्थान भारतातील, किंबहुना जगातील, प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. अतिशय निपुणतेने बनविले गेलेले किल्ले, कोट, हवेल्या, छत्र्या, मंदिरे, रंगेबिरंगी बांधणी आणि चटपटीत भुजिया ( शेव )..ही सर्वच राजस्थानची वैशिष्ट्ये आहेत. येथील प्रत्येक शहराचा आपला स्वतंत्र असा इतिहास आहे. राजस्थान मधील अनेक सुंदर पर्यटन स्थळांपैकी दोन पर्यटन स्थळे खास लक्षात राहण्याजोगी आहेत..ती म्हणजे रणकपूर आणि किराडू.

उदयपुरच्या जवळ असलेल्या रणकपूर येथे असलेले भव्य जैन मंदिर, अवर्णनीय शिल्पकलेचे उदाहरण आहे. हे जैन मंदिर, जैन पंथीयांच्या प्रमुख धर्मस्थळांपैकी एक आहे. हे मंदिर जैन तीर्थंकर रिषभनाथ यांना समर्पित आहे. रणकपूर मंदिराला तसेच रणकपूर गावला त्याचे नाव राणा कुंभ या राजा मुळे मिळाले आहे. राणा कुंभ यांचे या मंदिराच्या निर्माणामध्ये फार मोठे योगदान होते. रणकपूर मंदिराचे निर्माण हलक्या गुलाबी रंगाचे संगमरवर वापरून केले गेले आहे. मंदिराच्या आतील मंडपामध्ये असलेली शिल्पे अतिशय सुंदर कारागिरीचे उदाहरण आहेत. या सर्व शिल्पांचे वैशिष्ट्य असे की सर्व शिल्पे एकमेकांकडे पहात असल्याचा भास आपल्याला होतो. या मंदिराची भव्यता, आणि मंदिराच्या परिसरातील शांत वातावरण मन भारून टाकते. जैन मंदिराच्या जवळच सूर्य मंदिर आहे. हे मंदिरही उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना आहे.

बाडमेर पासून साधारण चाळीस किलोमीटर अंतरावर किराडू मध्ये असलेली मंदिरे देखील अप्रतिम शिल्पकलेने नटलेली आहेत. पण रणकपूरच्या जैन मंदिराचे मन प्रसन्न करून टाकणारे वातावरण किराडू इथे अनुभवायला मिळत नाही. असे म्हणतात की या मंदिरांचे निर्माण साधारण अकराव्या शतकात केले गले होते. आता या मंदिरांचे फक्त अवशेषच शिल्लक आहेत पण त्या अवशेषांवरून लगेच लक्षात येते की कधी काळी ही मंदिरे ही भव्य, सुंदर असतील. पण आता या मंदिराचा परिसर अगदी ओसाड आहे. इथे पर्यटकांची फारशी वर्दळही बघायला मिळत नाही. या मागचे कारण मोठे रोचक आणि काहीसे अस्वस्थ करणारे आहे. असे म्हणतात की या मंदिराचा आणि त्याच्या आसपास असलेल्या गावाचा विनाश एका साधूच्या शापामुळे ओढविला. त्या संदर्भातील गोष्ट अशी की एकदा एक साधू यात्रेसाठी जाताना आपल्या शिष्याला गावातच ठेऊन निघाले. तत्पूर्वी सर्व गावकऱ्यांना शिष्याची व्यवस्थित काळजी घेतली जावी अशी सूचना त्यांनी केली आणि ते साधू येत्रेस निघून गेले. ते गेल्यानंतर सुरुवातीला काही दिवस गावकऱ्यांनी त्या शिष्याची अगत्याने विचारपूस केली, पण जसजसा काळ लोटत गेला, तसतसा गावकऱ्यांना शिष्याचा विसर पडला. मात्र गावामध्ये राहणाऱ्या कुंभाराच्या पत्नीने शिष्याची देखभाल केली. कालांतराने साधू जेव्हा परत आले तेव्हा त्यांना सर्व हकीकत समजली. ते ऐकून त्यांना आपला राग अनावर झाला. त्यांनी सर्व गावकऱ्यांना शाप देऊन त्यांचे दगडी मूर्तींमध्ये परिवर्तन केले. मात्र त्या आधी कुंभाराच्या पत्नीला त्यांनी गाव सोडून जायला सांगितले, आणि जाताना मागे वळून न पाह्ण्याबद्दल ताकीद दिली. पण कुंभाराच्या पत्नीला आपले कुतूहल आवरले नाही. साधूने ताकीद देऊन सुद्धा तिने मागे वळून पहिलेच आणि त्या क्षणी तिचे देखील मूर्ती मध्ये परिवर्तन होऊन गेले. असे म्हणतात की आज ही सूर्यास्तानंतर तिथे थांबणाऱ्या व्यक्ती मूर्तीमध्ये परिवर्तीत होऊन जातात. अशी आख्यायिका आहे म्हणूनच की काय पण किराडूच्या मंदिरामध्ये पर्यटकांची गर्दी बघायला मिळत नाही.

Leave a Comment