केसांचाही करोडोंचा व्यापार


एखादा सामान्य वाटणारा व्यापार हाही करोडो रुपयांचा असू शकतो असा आपण विचारही करीत नाही पण भारतात दरसाल २ हजार पाचशे कोटी रुपयांचा केसांचा व्यापार होत असतो. हे सत्य आहे आणि त्याचे आकडे वाचल्यावर तर आश्‍चर्याला पारावार राहणार नाही. सार्‍या जगातच केसांचा व्यापार आणि निर्यात होत असते. पण जगभरात या व्यापारात भारताचा वाटा ८० टक्के आहे. भारतातून दरसाल १३०० टन मानवी केस निर्यात होतात. ज्या देशांत केसांपासून विग किंवा गंगावन यासारखी उप्पादने तयार केली जातात अशा देशांतल्या सुमारे २०० उत्पादकांना भारतातून ही निर्यात केली जाते. जगातल्या केसांच्या व्यापारात भारत आघाडीवर तर आहेच पण या व्यापाराचे केन्द्र चेन्नईत आहे.

देशांदेशांतले केसांची काही उत्पादने तयार करणारे कारखानदार चेन्नईत येऊन केसांचा सौदा करून टनांशी केसांच्या खरेदीच्या ऑर्डरी देऊन जातात. भारताचा हा व्यापार वर्षाला २५०० कोटी रुपयांचा आहे. भारताचा व्यापार जगाच्या व्यापाराच्या ८० टक्के आहे याचा अर्थ जगात या किरकोळ वाटणार्‍या वस्तूचा एकूण व्यापार सुमारे ३ हजार कोटी रुपयांचा असून त्यामुळे हजारो लोकांना रोजगार मिळत असतो. या व्यापारात दरसाल १० ते ३० टक्के वाढही होत आहे. भारतात काही मंदिरांत मुंडण करून देवाला केस अर्पण करण्याची प्रथा आहे. तिरुपतीच्या बालाजी मंदिरात असे केसार्पण मोठ्या प्रमाणावर होत असते. यातून हे केस मिळतात आणि हा व्यापार होतो.

बालाजीला दररोज किमान २५ हजार लोक केसार्पण करतात. हा आकडा पाहिला म्हणजे तिथे किती केस मिळत असतील याचा अंदाज येतो. केसांचा विक्रीचा दर केसाच्या लांबीवरून ठरतो. ३० इंच लांबीचे केस एक किलोला ७०० डॉलर अशा चढ्या भावाने विकले जातात. तर ११ इंच लांबीचे केस १०० डॉलर्स किलो अशा भावाने विकत घेतले जातात. अमेरिकेतल्या अनेक मान्यवरांच्या बायका हे केस विकत घेतात. याही क्षेत्रात आपल्या समोर चीनचा अनुभव आहे चीनमधून निर्यात होणार्‍या केसांचे प्रमाण कमी असले तरीही त्यांचा दर्जा चांगला असतो आणि त्यांना भारतातल्या केसांपेक्षा चांगला भावही मिळत असतो. मात्र एक गोष्ट नक्कीच खरी आहे की केस हा काही आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विषय होत असेल असे आपल्याला वरकरणी वाटत नाही पण प्रत्यक्षात मात्र मोठ्या भांडवलदारांनीही या केसांच्या यापारात लक्ष घातले आहे. कारण कमाई मोठी आहे.

Leave a Comment