उद्यापासून महागणार गोकुळचे दूध


कोल्हापूर – उद्यापासून गोकुळच्या दुधाचे दर राज्यात वाढणार असून हे नवे दर उद्या १ ऑगस्टपासून लागू होणार असून ग्राहकांना आता गोकुळचे गायीचे दूध घेण्यासाठी दोन रूपये जास्त मोजावे लागणार आहेत. ग्राहकांना सध्या गोकूळच्या एका लीटर दूधासाठी ३८ रूपये मोजावे लागतात. पण हेच दर आता ४० रूपये एवढे होणार आहेत. तर सध्या गोकुळचे टोन्ड दूध ४० रुपयांना विकले जाते. उद्यापासून ते ४२ रुपयांना विकले जाईल. याशिवाय, गोकुळ लाईफच्या दूधाचे दर ४२ रुपयांऐवजी ४४ रूपये एवढे करण्यात आले आहेत. या निर्णयाचा फटका मुंबईतील ग्राहकांच्या खिशाला बसणार आहे. केवळ गायीच्या दुधासाठी गोकुळची ही दरवाढ असून म्हशीच्या दुधाच्या दरात अजूनपर्यंत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

यापूर्वी राज्य सरकारने राज्यातील शेतकरी संपाची तीव्रता वाढू लागल्याने त्याची धास्ती घेत दूध दरात तीन रुपये वाढ करण्याचा निर्णय जूनच्या मध्यास घेतला होता. शासनाने ही दरवाढ करण्यापूर्वी दूध संस्थांची बैठक घेतली असता एकतर्फी दरवाढ लादू नये, अडचणीत असलेल्या संस्थांना ती परवडणारी नाही, असा सूर संस्थाचालकांनी लावला होता. ‘गोकुळ’ दूध संघाने त्यानंतर दूध दरवाढ करणार असल्याचे स्पष्ट केले असून पाठोपाठ अन्य खासगी व सहकारी दूध संघही दरवाढीचा हाच मार्ग अनुसरणार असल्याचे संकेत मिळाले होते. दरवाढीचा बोजा दूध संघानी आपल्या खांद्यावर न घेता तो ग्राहकांच्या डोक्यावर लादण्याची खेळी केली असल्याने ग्राहकांना वर्षांकाठी सातशे कोटी रुपये ज्यादाचे मोजावे लागणार आहेत .

Leave a Comment